मुंबई : वृत्तसंस्था
दरवर्षापेक्षा यंदा राज्यात पाऊस कमी झाला असून अशा परिस्थितीतही कांदा उत्पादन चांगले राहिले. मात्र, याउलट कांदा बियाणेबाबत परिस्थती आहे. यावर्षी राज्यात कांदा बियाणे उत्पादनात मोठ्या शक्यता व्यक्त केली आहे. अशातच आता मागील आठ दिवसांमध्ये कांदा बियाणे दरात दुपटीने वाढ झाल्याचे सांगितले जात आहे. कांदा बियाणेसाठी प्रसिद्ध असलेल्या औरंगाबाद जिल्ह्यात सध्या कन्नड बाजार समितीत, यंदा बोहनीच्या कांदा बियाण्याला 35 हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत दर मिळत आहे. ज्यात येत्या काही दिवसांत आणखी वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
यावर्षी कांदा उत्पादन चांगले राहिले असले तरी अनेक शेतकऱ्यांना उन्हाळ्यात पाण्याची कमतरता होती. ज्यामुळे जानेवारी ते एप्रिल या ऐन उन्हाळ्यात अधिकचे कांदा बियाणे (Onion Seeds) उत्पादन घेणे, शक्य झाले नाही. परिणामी, यंदा डोंगळे लागवडीत घट झाली असून, याचा थेट बियाणे उत्पादनावर पाहायला मिळत असून, सध्या कांदा बियाणे दरात दुपटीने वाढ झाली आहे. आठ दिवसांपूर्वी कांद्याचे बियाणे 15 ते 19 हजार रुपये प्रति क्विंटल विकले जात होते. मात्र, त्यात सध्या 35 हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत वाढ झाली आहे. इतकेच नाही येत्या काळात कांदा बियाण्याचे दर 50 ते 55 हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत वाढण्याची शक्यता असल्याचेही जाणकारांकडून सांगितले जात आहे.
शेतकऱ्यांना कांदा बियाण्याचे उत्पादन घेण्यासाठी डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या पंधरवड्यात त्यासाठी तयारी करावी लागते. यात उपलब्ध कांद्यामधून उच्च प्रतीचे मातृकंद लागवडीसाठी निवडले जातात. ज्यानंतर त्यांची लागवड केल्यानंतर जवळपास 4 महिन्यांच्या कालावधीनंतर बियाणे परिपक्व होते. मात्र, या संपूर्ण कालावधीत शेतकऱ्यांना कांदा बियाणे पिकाला (डोंगळे) प्रत्येक 5 ते 6 दिवसांनी पाणी द्यावे लागते. यात मधमाशांची भूमिका देखील तितकीच महत्वाची असते. मधमाशा उपलब्ध असतील तर परागीभवनास मदत होऊन, कांदा बियाणे उत्पादनात भरघोस वाढ होण्यास मदत होते.