सोलापूर : प्रतिनिधी
सोलापूर शहर व जिल्ह्यात सलग चौथ्या दिवशी अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे विविध भागात वादळी वाऱ्यासह पावसाने सुरुवात केली होती. गुरुवारी सायंकाळी झालेल्या पावसाची ६.० मि.मी. नोंद झाली आहे. या अवकाळी पावसात वीज पडून तीन शेळ्या आणि दोन गायींचा मृत्यू झाला. मनुष्य हानी झालेली नाही. तर शेती पिकांचेही मोठे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
गेल्या आठवडाभरापासून सोलापूर शहर व जिल्ह्यातील वातावरणात कमालीचा बदल झालेला आहे. गेल्या पंधरा ते वीस दिवसापासून वाढत चाललेल्या तापमानामध्ये अचानक घट झाली असून आता तापमानाचा पारा ३८ अंशावर पोहचला आहे. तर गेल्या तीन चार दिवसापासून सातत्याने अवकाळी पाऊस जिल्ह्यातील विविध भागात पडत आहे. या पावसामुळे बार्शी तालुक्यातील रेवेवाडी येथे वीज पडून १ शेळी आणि दोन पिल्लांचा मृत्यू झाला आहे तर काटेगांव येथे वीज पडून १ गाय आणि बार्शी तालुक्यातील उंडेगाव येथेही एका गायीचा मृत्यू झाला असून, मंगळवेढा तालुक्यातील विविध भागात जवळपास १५ ते २० घरांची पडझड झाली. अनेकांच्या घरावरील पत्रे उडून गेल्याच्या घटना घडल्या आहेत. शेती पिकांपैकी काढून पडलेला कडबा, आंबा, तसेच इतर फळ पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. याची अधिकृत माहिती कृषी विभागाकडून मिळू शकली नाही