सोलापूर : प्रतिनिधी
घरामध्ये महिला एकटी असताना दोन इसमाने पिण्याचे पाणी मागण्याच्या उद्देशाने घरात घुसून चाकूचा धाक दाखवून कपाटातील रोख रक्कम २ लाख २६ हजार रुपये रोख व २० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने जबरदस्तीने घेऊन गेल्याची घटना बार्शी येथील परंडा रोड, गांधी स्टॉप येथे दि. १२ एप्रिल रोजी १.३० वाजण्याच्या सुमारास घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, याबाबत दीपाली ऋषीकेश नाईकवाडी यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. घरातील सासू सासरे व मुलगी पुणे येथे गेल्याने दीपाली व ऋषीकेश हे दोघे घरी होते. ऋषीकेश हा कामानिमित्त दुपारी १.३० च्या सुमारास घराबाहेर गेल्यानंतर अनोळखी तोंडाला रुमाल बांधलेल्या दोन इसमाने दीपाली यांना पिण्यासाठी पाणी मागितले. दरम्यान, दीपाली पाणी आणण्यासाठी किचनमध्ये गेल्या असता ते दोघे घरामध्ये आले. त्यांनी हॉलमध्ये चालू असलेल्या टी.व्ही.चा आवाज वाढविला व दीपालीकडे कपाटाची चावी मागितली. चावी देण्यास नकार दिला असता, त्याने धमकावून दीपालीस खाली बसण्यास सांगितले. त्यानंतर एकाने बेडरूममध्ये जाऊन कपाट उघडले. तेथे ठेवलेले २ लाख २६ हजार रुपये व २० हजार रुपये किमतीचे दागिने घेतले. त्यानंतर दुसऱ्या कपाटाची चावी मागत असल्याने दीपाली यांनी त्यास नकार दिला असता त्यावेळी चोराने दीपालीशी झटापट करण्याचा प्रयत्न केला. चोराच्या हातात असलेला चाकू दीपाली यांच्या हाताला लागून जखम झाली. दीपाली ओरडू लागताच चोरटे त्यांना धमकावून बाहेरून कडी लावून पळून गेले. याबाबत शहर पोलीस अधिक तपास करत आहेत.