मुंबई : वृत्तसंस्था
राज्यात उन्हाचा पारा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. कडक ऊन आणि उकाड्यामध्ये मुंबई, पुणे, नागपूर, नाशिकसह राज्यातील सर्वच जिल्ह्यातील नागरिक त्रस्त झाले आहेत. उकाड्यामुळे हैराण झालेल्या नागरिकांना आरोग्याशीसंबंधित अनेक समस्या निर्माण होऊ लागल्या आहेत. राज्यात उष्माघाताच्या रुग्णसंख्येमध्ये देखील वाढ होऊ लागली आहे. १ मार्चपासून ते आतापर्यंत राज्यामध्ये उष्णाघाताचे ७७ रुग्ण आढळल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन वारंवार केले जात आहे.
राज्यामध्ये १ मार्च ते १२ एप्रिल या कालावधीमध्ये उष्माघाताच्या ७७ रुग्णांची नोंद झाल्याची माहिती राज्याच्या आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. यामधील एकही प्रकरण मुंबईतील नाहीत. मुंबई सोडून राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये उष्माघाताचे रुग्ण आढळले आहेत. ठाणे, नागपूर, चंद्रपूर आणि राज्यातील इतर आठ जिल्ह्यातील तापमान हे ४०० डिग्री सेल्सिअसच्या पुढे गेले नाही. आतापर्यंत जे ७७ रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी ३६ उष्माघाताचे रुग्ण हे ४ एप्रिल ते १२ एप्रिल या आठ दिवसांच्या कालावधीमध्ये आढळले आहेत. हे राज्यात वाढत्या तापमानाचा इशारा देत आहे.
महत्वाचे म्हणजे, राज्यात ४२ दिवसांमध्ये ७७ उष्माघाताची रुग्ण आढळले आहेत. मागच्यावर्षी याच कालावधीमध्ये ३७३ उष्णाघाताचे रुग्ण आढळले होते. यावर्षीची रुग्णसंख्या ही मागच्या वर्षीच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत कमी आहे. मिळालेल्या माहितीनुसार, यावर्षी बुलडाण्यामध्ये उष्माघाताच्या १२ रुग्णांची नोंद झाली आहे. सिंधुदुर्गमध्ये ९ रुग्ण, वर्ध्यात ७ रुग्ण, नाशिकमध्ये ६ रुग्ण, कोल्हापूरात ५ रुग्ण आणि पुण्यात ५ रुग्णांची नोंद झाली आहे. तर ठाणे जिल्ह्यामध्ये मार्चपासून ३ रुग्ण आढळले आहेत.
राज्याच्या आरोग्य विभागाचे सहसंचालक डॉ. कैलाश बाविस्कर यांनी सांगितले की, ‘वाढत्या तापमानाचा लोकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. त्यामुळे निर्जलीकरणापासून ते उष्माघातापर्यंत अनेक आरोग्यविषयक समस्या निर्माण झाल्या आहेत.’ राज्यातील नागरिकांसाठी तसेच वैद्यकीय संस्थांसाठी नियमावली जारी करण्यात आली आहे. राज्यातील अनेक भागांचे तापमान हे ४०० अंशाच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. महत्वाचे म्हणजे राज्यात यावर्षी उष्माघाताने कोणाचाही मृत्यू झालेला नाही.