धाराशिव : वृत्तसंस्था
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले संविधान आपण सर्व पाळतो. ७५ वर्षांपासून या संविधानानुसारच देश चालतो; परंतु भाजप सरकारला हे संविधान बदलायचे आहे. भाजपमुळेच देशातील लोकशाहीला व संविधानाला धोका निर्माण झाला आहे, अशी टीका माजी मंत्री तथा युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केली.
४० – उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी मंगळवारी शक्तिप्रदर्शन करून उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी खा. राजेनिंबाळकर यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत आदित्य ठाकरे बोलत होते. सभेस माजी मंत्री अमित देशमरख राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे युवानेते आ. रोहित पवार, खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी पुढे बोलताना माजी मंत्री आदित्य ठाकरे म्हणाले, डॉ. बाबासाहेबांनी आपल्याला संविधान दिले आहे. आपण सर्व त्या संविधानाने दिलेले नियम पाळतो. ७५ वर्षांपासून या संविधानावरच आपला देश चालतो.
भाजपला हे संविधान बदलायचे आहे. भाजपकडून केवळ जुमलेबाजी सुरू आहे. खोटे बोला. पण रेटन बोला हेच भाजपचे धोरण आहे. भाजप सरकारकडून केवळ देशातील लोकशाहीसह संविधानास धोका आहे, अशी टीका माजी मंत्री ठाकरे यांनी केली. देशात परिवर्तनाची लाट आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत मतदारांनी इंडिया आघाडीच्या पाठीशी उभे राहावे, असे आवाहन त्यांनी केले. सभेस शिवसेना (उद्धव ठाकरे), राष्ट्रवादी (शरद पवार) व काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.