उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत गोकुळ शुगरचे अध्यक्ष दत्ता शिंदे भाजपात दाखल
भाजपची ताकद वाढवण्याचा प्रयत्न करू
अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
धोत्री येथील गोकुळ शुगर कारखान्याचे अध्यक्ष दत्ता शिंदे यांचा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह जिल्ह्याच्या प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश झाला.उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह प्रमुख मान्यवरांनी शिंदे यांचे उपरणे घालून पक्षामध्ये स्वागत केले.यावेळी शिंदे यांनी देखील उपस्थित मान्यवरांचे आभार मानले.
मंगळवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे महायुतीचे उमेदवार राम सातपुते यांच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या निमित्ताने सोलापूर दौऱ्यावर आले होते.त्यावेळी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात हा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम घेण्यात आला.व्यासपीठावर महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते खासदार रणजितसिंह नाईक – निंबाळकर, खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी,आमदार विजयकुमार देशमुख, सुभाष देशमुख, भाजप जिल्हाध्यक्ष तथा अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार समाधान आवताडे, आमदार यशवंत माने, आमदार बबनराव शिंदे, आमदार संजय शिंदे, आमदार जयकुमार गोरे, आमदार शहाजी पाटील, माजी मंत्री प्रा. लक्ष्मणराव ढोबळे, माजी आमदार राजन पाटील, दीपक साळुंखे, प्रशांत परिचारक, भाजपाचे ज्येष्ठ नेते किशोर देशपांडे, भाजपाचे लोकसभा निवडणूक प्रमुख विक्रम देशमुख, शहराध्यक्ष नरेंद्र काळे, जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदारसिंह केदार, लोकसभा निवडणूक प्रमुख शहाजी पवार आदींची उपस्थिती होती.प्रारंभी व्यासपीठावरील सर्व मान्यवरांनी शिंदे यांचे पक्षांमध्ये स्वागत करून अभिनंदन केले. पक्षप्रवेशानंतर पत्रकारांशी बोलताना दत्ता शिंदे म्हणाले,सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली अबकी बार चारसो पारचा नारा देण्यात आला आहे आणि यावेळी देखील देशात भाजपची तिसऱ्यांदा सत्ता येणार आहे. याबद्दल कोणीही शंका घेण्याचे कारण नाही. तिसऱ्यांदा ते बहुमताने पंतप्रधान होणार आहेत.त्यांना पाठिंबा देण्यासाठी म्हणून आपण देखील पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे. आमचे वडील बलभीम शिंदे हे पूर्वीपासून भाजप प्रेमी आहेत.ते पक्षाचे जिल्हाध्यक्ष होते.
आगामी काळात अक्कलकोट व सोलापूर जिल्ह्यात आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्ष वाढविण्याचा प्रयत्न प्रामाणिकपणे करणार आहे.याला सर्व वरिष्ठ नेतेमंडळींनी साथ देण्याचा शब्द दिला आहे.त्यानुसार तळागाळातील कार्यकर्त्यांपर्यंत पोचून भारतीय जनता पक्षाची ताकद आणखी वाढविणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली. यावेळी झालेल्या कार्यक्रमाला शिंदे यांचे समर्थक तसेच भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली होती.