अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
येथील ग्रामदैवत श्री मल्लिकार्जुन यात्रेला शुक्रवार दि.१९ एप्रिलपासून प्रारंभ होत आहे.ही यात्रा पाच दिवस चालणार आहे.प्रतिवर्षी चैत्र शुद्ध एकादशी ते चैत्र शुद्ध पौर्णिमेपर्यंत हा उत्सव साजरा करण्यात येतो. यात्रेतील वैशिष्ट्य म्हणजे नंदीध्वज काठ्या असून याची स्थापना गुढीपाडव्यादिवशी केली जाते.एकादशीपासून छोट्या मंदिरावर नयनरम्य विद्युत रोषणाई करण्यात येते.
या पवित्र काठ्यांचे पाच मानकरी आहेत. अप्पासाहेब पाटील, नागराज रोडगे, विजयकुमार लिंबीतोटे,सुनील नंदीकोले, स्वामीनाथ आडवीतोटे हे मानकरी आहेत. १९ एप्रिलला या पवित्र काठ्यांची सवाद्य मिरवणूक अक्कलकोट नगरीतून प्रमुख मार्गावरून येऊन बस स्थानकाजवळील मंदिरास व मल्लिकार्जुन देवालयास प्रदक्षिणा घालून आरती संपल्यानंतर परत जातात असा नित्य कार्यक्रम पौर्णिमेपर्यंत चालत असतो.दि.१९ एप्रिल हा दिवस चैत्र एकादशीचा दिवस असून या दिवशी पहाटे ५ वाजता महाअभिषेक व आरती होईल. २२ एप्रिल रोजी परंपरेनुसार मदलसी कावड नाचवण्याचा कार्यक्रम आयोजित केला जातो.हा कार्यक्रम पुरोहित वर्गाकडून होत असतो.दि.२३ एप्रिल रोजी सकाळी सकाळी आठ वाजता रथास कळसारोहण व ११ वाजता पारंपारिक पद्धतीने सजवलेल्या काठ्यांची सवाद्य मिरवणूक नगरीतील मुख्य मार्गावरून निघते.याप्रसंगी पारंपरिक वेश भूषा धारण करून या मिरवणुकीत मोठ्या संख्येने भाविक सहभागी होत असतात.
या पाचही काठ्या बसवेश्वर मंदिरास व मल्लिकार्जुन देवालयास प्रदक्षिणा घातल्यानंतर सायंकाळी ७ वाजता सूर्यास्ताच्या वेळी रथोत्सवास प्रारंभ होतो.यात हजारो भक्त आपली सेवा रुजू करतात.वरील सर्व कार्यक्रम मल्लिकार्जुन देवालयाचे विश्वस्त मंडळ व सर्व भक्तांच्या सेवेतून होत असतात.या सर्व सोहळ्याला भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन देवस्थानचे अध्यक्ष व विश्वस्त मंडळांनी केले आहे.