बीड : वृत्तसंस्था
गेल्या काही महिन्यापासून मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी देशभर प्रसिद्ध झालेले मनोज जरांगे पाटील हे पुन्हा एकदा लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर चर्चेत आले आहे. त्यांनी थेट भाजपच्या उमेदवाराला इशाराला दिला आहे.
मी तुमच्या वाटेला गेलो नाही, माझ्या वाटेला जाऊ नका असा थेट इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना दिला आहे. ‘बाता मारून आणि आमरण उपोषण करून आरक्षण मिळत नाही’ असे विधान पंकजा मुंडे यांनी एका सभेत केले होते. त्यानंतर जरांगे यांनी बीडमध्ये पत्रकारांशी बोलतांना यावर भाष्य केले आहे.
जरांगे म्हणाले, ”पंकजा मुंडे काय म्हणाल्या हे मी ऐकलले नाही. मी त्यांना विरोधक मानलेले नाही, समाजालाही नाही. मी तुमच्या वाटेला गेलो नाही, माझ्या वाटेला जाऊ नका. उपोषण करूनच माझ्या समाजाला आरक्षण मिळाले. आता पुढील उपोषणामुळे उरलेले आरक्षण देखील मिळेल. मी पंकजा यांच्याबद्दल एक शब्दही बोललो नाही. माझ्या वाट्याला गेल्यावर मी सोडत नाही”, असे जरांगे यांनी ठणकावून सांगितले. त्यामुळे जरांगे पाटील यांचे हे वक्तव्य चर्चेत आले आहे.
दरम्यान, जरांगे यांच्या या विधानानंतर पुन्हा पंकजा मुंडे यांनी सभेत बोलतांना याप्रकरणी सारवासारव केली आहे. त्या म्हणाल्या, ”मी वेगळ्या विषयावर बोलत होते. मात्र कोणी तरी मी जरांगेंवर बोलते होते असा समज करून घेतला. मात्र मी गेल्या वर्षभरात जरांगे यांचे नावही घेतलेले नाही. मी कोणावर टीका केलेली नाही आणि टीका केली तरी मी गोपीनाथ मुंडेंची लेक आहे शब्द मागे घेत नाही”, असे पंकजा म्हणाल्या.
आष्टी तालुक्यातील उंदरखेल येथे झालेल्या जाहीर सभेत पंकजा मुंडे यांनी मराठा आरक्षणाच्या आंदोलनासंदर्भात वक्तव्य केले होते.
‘विधानसभेच्या निवडणुकीत आरक्षण मागा. मुख्यमंत्र्यांनी तुम्हाला आरक्षणाचा शब्द दिलाय. बाता मारून आणि आमरण उपोषण करून आरक्षण मिळत नाही.’, अशा शब्दांत पंकजा मुंडेंनी आरक्षणाच्या मुद्द्यावरून संताप व्यक्त केला होता. यावरूनच आता जरांगे यांनी प्रत्युत्तर दिले.