ध्यास विश्वसार्ह बातमीचा

आ.एकनाथ खडसेंचा भाजप प्रवेश रखडला ?

मुंबई : वृत्तसंस्था

लोकसभा निवडणूक सुरु झाल्यावर शरद पवार गटाचे नेते आ.एकनाथ खडसे भाजपात येणार असल्याचे कबूल केले होते. भाजपच्या राज्यातील नेत्यांत एकच खळबळ माजली. पण आता त्यांच्या घोषणेला 15 दिवस लोटले तरी अद्याप त्यांचा भाजप प्रवेश झाला नाही. यामुळे याविषयी उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, भाजपच्या राज्यातील काही नेत्यांनी दिल्ली दरबारी खडसे पक्षात आल्यास फायद्यापेक्षा तोटाच जास्त होईल असे पटवून दिले आहे. यामुळेच खडसे यांचा भाजप प्रवेश रखडला आहे.

भाजपने एकनाथ खडसे यांच्या स्नुषा रक्षा खडसे यांना रावेर लोकसभा मतदारसंघातून सलग तिसऱ्यांदा उमेदवारी दिली आहे. तेव्हापासूनच एकनाथ खडसे पुन्हा स्वगृही परतणार अशी चर्चा रंगली आहे. स्वतः एकनाथ खडसे यांनीही या चर्चेची पुष्टी केली. पण त्यानंतर पुढे काहीच घडले नाही.

काय म्हणाले होते एकनाथ खडसे?
हो, मी भाजपमध्ये घरवापसी करणार आहे. मी भाजपमध्ये प्रवेश करतोय असे म्हणण्यापेक्षा मी माझ्या घरी जातोय. मी नुकतीच पक्षाध्यक्ष जे पी नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. त्यांच्याशी माझ्या पक्ष प्रवेशाच्या मुद्यावर चर्चा केली. त्यानुसार येत्या 15 दिवसांत माझा भाजप प्रवेश होईल, असे एकनाथ खडसे आपल्या भाजप प्रवेशावर भाष्य करताना म्हणाले होते. त्यांच्या या विधानाला आता 2 आठवडे उलटलेत. पण त्यानंतरही त्यांचा भाजप प्रवेश होऊ शकला नाही.

दुसरीकडे, राजकीय वर्तुळात एक वेगळीच चर्चा सुरू झाली आहे. खडसे यांच्या भाजप प्रवेशाला जळगावमधील स्थानिक नेत्यांचा विरोध आहे. रावेर लोकसभा मतदारसंघातून रक्षा खडसे यांना कोणत्याही परिस्थितीत निवडून आणण्यासाठी भाजपच्या दिल्लीतील नेत्यांना एकनाथ खडसे यांची मदत घ्यायची आहे. पण राज्यातील नेत्यांना खडसे आपल्या पक्षामध्ये नको आहेत. त्यामुळे खडसेंनी भाजपश्रेष्ठींची भेट घेतल्याची बातमी फुटताच त्यांनी पक्षश्रेष्ठींकडे खडसे पुन्हा भाजपमध्ये आल्यास पक्षाचा काहीच फायदा होणार नाही उलट नुकसानच जास्त होईल असा निरोप पाठवला आहे. यामुळे खडसे यांचा भाजप प्रवेश लांबल्याची चर्चा आहे.

एकनाथ खडसे यांचे राजकीय प्रतिस्पर्धी गिरीश महाजन यांनी नुकतीच खडसेंवर टीका केली होती. यासाठी त्यांनी त्यांना विझलेल्या दिव्याची उपमा दिली होती. गिरीश महाजन पत्रकारांशी बोलताना म्हणाले होते की, एकनाथ खडसे एखाद्या विझलेल्या दिव्यासारखे आहेत. त्यांची पत्नी व मुलीचाही निवडणुकीत पराभव झाला. सध्या एकही ग्रामपंचायत त्यांच्या हातात नाही. ते एका बँकेला नियंत्रित करत होते. पण आता संचालक मंडळ बदलले असून, नव्या बोर्डाचे सदस्य त्यांचे काहीही ऐकत नाहीत. त्यामुळे त्यांच्या भाजप प्रवेशाच्या निर्णयाला फारसे महत्त्व देण्याची गरज नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!