अमरावती: वृत्तसंस्था
गत लोकसभा निवडणुकीत नवनीत राणा यांना पाठिंबा देऊन आपली चूक झाली. आपण अमरावतीकरांची माफी मागतो, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार म्हणाले होते. पण, देशाचे कृषीमंत्री, राज्याचे मुख्यमंत्री असताना त्यांनी विदर्भासाठी काय केले. त्यांच्या कार्यकाळात हजारो शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. त्यामुळे त्यांनी आधी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांची माफी मागायला हवी, अशी टीका केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी बुधवारी येथे केली.
महायुतीच्या उमेदवार नवनीत राणा यांच्या प्रचारार्थ सायन्सकोरच्या प्रांगणावर आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. व्यासपीठावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खा. अनिल बोंडे, आ. रवी राणा, आ. प्रवीण पोटे, आ. प्रताप अडसड, आ. प्रकाश भारसाकळे यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. अमित शाह यांनी आपल्या भाषणात राहुल गांधी, शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. ते म्हणाले, शरद पवार यांच्या कार्यकाळात विदर्भातील सिंचनाकडे दुर्लक्ष झाले. त्यामुळे शेतकरी संकटात सापडले. भाजप-शिवसेना सरकारने सिंचनाचे क्षेत्र वाढविण्यासाठी पुढाकार घेतला असून वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्पामुळे जलक्रांती घडून येणार आहे.
उद्धव ठाकरे यांचे सरकार असताना अमरावतीत उमेश कोल्हे यांची हत्या करण्यात आली. मात्र, स्वतःला हिंदूहितरक्षक सांगणारे उद्धव ठाकरे यांनी या प्रकरणात काहीच कारवाई केली नाही. त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांचे संस्कार सोडले. आता महाराष्ट्रात एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांचे सरकार आले आहे. त्यामुळे यापुढे कुण्या उमेश कोल्हेची हत्या होणार नाही, असे अमित शाह म्हणाले.
भाजपची सत्ता पुन्हा आली, तर मागासवर्गीयांचे आरक्षण हटवले जाईल, अशी अफवा काँग्रेसकडून पसरविली जात आहे. पण, आरक्षण कुठल्याही परिस्थितीत हटवले जाणार नाही, ही मोदी यांची गॅरंटी आहे. आम्ही बहुमताचा वापर हा ३७० कलम हटवण्यासाठी केला. तिहेरी तलाकची प्रथा बंद केली. नागरिकत्व सुधारणा कायदा आणला. त्यामुळे राहल गांधी यांनी शेखचिल्लीप्रमाणे स्वप्ने पाहू नयेत, अशी टीका अमित शाह यांनी केली.
काश्मीरचे महाराष्ट्रातील जनतेला काय देणे-घेणे, असे वक्तव्य काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केले. मात्र, येथील लहान मुलगासुद्धा काश्मीरसाठी जीव देऊ शकतो, याची त्यांना कल्पना नाही. अयोध्या येथील रामलल्ला प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याचे निमंत्रण राहुल गांधी व उद्धव ठाकरे यांनाही देण्यात आले होते. परंतु, त्यांनी प्राणप्रतिष्ठापनेला न जाऊन प्रभू श्रीराम यांचा अपमान करण्याचे काम केल्याची टीका अमित शाह यांनी केली. नरेंद्र मोदींनी अनेक कामे केलीत. त्यातील काही कामे ही मोदींशिवाय शक्य नव्हती. त्यांनी कलम ३७०, तिहेरी तलाक, दहशतवाद व राज्यातील नक्षलवाद संपवण्याचे काम केल्याचा दावाही अमित शाह यांनी केला.