वर्धा : वृत्तसंस्था
देशातील अनेक भागात आज लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्यात वर्धा लोकसभा मतदारसंघसाठी मतदान होत आहे. सकाळपासून नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदान केंद्रावर मोठी गर्दी केली आहे. अशामध्ये हिंगणघाटमध्ये ईव्हीएम मशीन बंद पडल्याची माहिती समोर आली आहे. हिंगणघाट तालुक्यातील चानकी (कोरडे) येथील मतदान केंद्रावर हा प्रकार घडला आहे. त्यामुळे मतदान केंद्रावर नागरिकांची मोठी गर्दी झाली आहे.
दुसरीकडे यवतमाळमध्ये देखील ईव्हीएम मशीन बंद पडल्याचा प्रकार समोर आला आहे. यवतमाळच्या पुसद तालुक्यातील हुडी बुद्रुक येथील मतदान केंद्रावरील हा प्रकार आहे. गेल्या दीड तासांपासून ईव्हीएम मशीन बंद पडले आहे. त्यामुळे मतदारांची गैरसोय झाली आहे. केवळ 328 मतदान झाल्यानंतर मशीन बंद पडले.
हिंगणघाट तालु्क्यातील चानकी (कोरडे) या गावातील मतदान केंद्रावर तब्बल सव्वा दोन तास ईव्हीएम मशीन बंद पडले होते. चानकी मतदान केंद्रावर सकाळी 10 वाजता ईव्हीएम मशीन बंद पडले होते. आता सव्वा दोन तासांनंतर मतदान प्रक्रिया सुरु झाली आहे. चानकी (कोरडे) येथील बूथ क्रमांक 314 मधील हा प्रकार आहे. चानकी येथे 1178 मतदार आहेत. मशीन बंद होण्यापूर्वी फक्त 118 नागरिकांनी मतदान केले होते.
आता पुन्हा मतदान सुरु झाले असून मतदान केंद्रावर नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे. आज सकाळपासून वर्धा जिल्ह्यातील देवळी, कारंजा, वर्धा आणि हिंगणघाट या चार ठिकाणी ईव्हीएम मशीन बंद पडल्याच्या घटना घडल्या होत्या. ईव्हीएम दुरूस्तीनंतर या मतदान केंद्रावर पुन्हा मतदान प्रक्रिया सुरू झाली आहे. मतदारांना पुन्हा मतदान करण्यासाठी बोलावले जात आहे.
दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्यात वर्धा लोकसभा मतदारसंघासाठी मतदान होत आहे. वर्धा लोकसभा मतदारसंघात एकूण 1997 मतदान केंद्रावर मतदानाची प्रक्रिया पार पडत आहे. या मतदारसंघात यंदा 24 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहे. यात भाजपाचे रामदास तडस आणि शरद पवार गटाचे अमर काळे यांच्यात जोरदार टक्कर होणार असल्याचे चित्र आहे. वर्धा लोकसभा मतदारसंघात एकूण 6 विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे.