बारामती: वृत्तसंस्था
काही जण माझी सभा झाली की, समोरच्या पार्टीकडे जातात. मी बिनविरोध पदे दिली आणि प्रचार मात्र त्यांचा करता, कुंकू लावायचे असेल, तर एकाचेच लावा. हा काय चाटाळपणा लावलाय. हे झाकून राहत नाही, मला कळते. जिल्हा बँकेच्या निवडणुकीतसुद्धा मला कळले होते, पण जुनेपुराने उकरून काढायचे नाही, असे मी ठरवले – आहे. मात्र, आता कुठेही इकडचे तिकडचे करू नका, असा दम उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना दिला.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांची शिर्सुफळ (ता. बारामती) – येथे महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा – पवार यांच्या प्रचारार्थ सभा – आयोजित केली होती. यावेळी – स्थानिक पदाधिकारी व सरपंचांनी – येथील पाणी, ओढा खोलीकरण, समाज मंदिर, ट्रान्सफॉर्मर दुरुस्ती, संघाला सभासद करा, मुळशी धरणाचे पाणी बारामती, इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्याला कसे मिळेल ते पाहा, अशा अनेक समस्या सांगितल्या.
अजित पवार म्हणाले की, भावनेच्या भरात भाषणामधून शब्दप्रयोग होतात. या शब्दाविषयी जागरूक असल्याचे सांगत मी भाषण करताना सतत मेंदूला शांत राहण्याच्या सूचना देत असतो. निंबोडी (ता. इंदापूर) येथील सभेत केलेले वक्तव्य अजूनही अजितदादांना चांगलेच बोचते आहे. रविवारीही त्यांनी शिर्सुफळ येथील सभेत बोलताना याचा उल्लेख केला. काही वर्षांपूर्वी माझ्या तोंडून चुकून ते धरणातील वाक्य गेले व त्याचा फार मोठा फटका मला बसला. बारामतीत भावनिक करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र, ही निवडणूक आपल्या भविष्यासाठी आहे, सांगत मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी महायुतीला मतदान करा, असे आवाहन त्यांनी केले. यापूर्वी शरद पवार लोकसभा अर्ज भरून सांगता सभेला यायचे, हे सर्व यंत्रणा बघत होती. त्यांनी काही दिवसांपूर्वी आपण जरा बाजूला जात असून, पक्ष सांभाळा, वाढवा, अशी भूमिका घेतली. मात्र, आता परिस्थिती बदलली आहे. त्यांच्या विचारांच्या खासदाराने मागील दहा वर्षांत केलेले एक काम सांगावे, असा टोला सुळे यांना लगावला.
आमदार रोहित पवार यांचा संदर्भ देत म्हणाले, उद्या कदाचित ते बोलतील अजित पवार दम द्यायला लागलेत. अरे बाबा, तुला कसा जिल्हा परिषद सदस्य केला, मला माहितेय, असा नाव न घेता रोहित पवार यांना टोला मारला. महायुतीच्या सर्व घटक पक्षांनी आपल्या सहकारी पक्षाचे काम करायचे असल्याचे अजित पवार यांनी सांगितले.