सोलापूर : वृत्तसंस्था
लोकसभा मतदार संघात मोदींची सभा होत आहे. या मतदारसंघात भाजपचे उमेदवार राम सातपुते आणि काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांच्यात लढत होत आहे. वास्तविक प्रणिती शिंदे यांच्या वतीने बाहेरचा उमेदवार म्हणून राम सातपुते यांच्यावर टीका करण्यात येत आहे. तर राम सातपुते यांनीही प्रणिती शिंदे यांच्यावर घराणेशाहीचा आरोप केला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर मोदींची सभा महत्त्वाची मानली जात आहे.
‘माझ्या प्रिय सोलापुरकरांना माझा नमस्कार’ म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठीतून भाषणाला सुरूवात केली. सोलापूर लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार राम सातपुते यांच्यासाठी नरेंद्र मोदी यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या वेळी नरेंद्र मोदी यांनी जय-जय रामकृष्ण हरी नावाचा जयघोष करत आपल्या भाषणाला सुरूवात केली.
2024 मध्येच या आधी मी सोलापूरला आलो होतो. मात्र, त्यावेळी तुम्हाला द्यायला आलो होतो, आता मात्र मी तुमच्याकडे मागण्यासाठी आलो असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. मला सोलापुरकरांचा आशीर्वाद हवा आहे. मी तुमचा आशीर्वाद मागण्यासाठी आलो असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. मला तुमच्याकडून धन-दौलत नको आहे. तर तुमची स्वप्न पूर्ण करण्यासाठी आशीर्वाद हवा असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.
माझे काम तुम्ही गेल्या दहा वर्षात पाहिले आहे. एकिकडे माझे काम आहे. तर दुसरीकडे इंडिया आघाडीमध्ये नेतृत्वासाठी भांडणे चालू असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. सध्या इंडिया आघाडीत महायुद्ध सुरू असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. आता पाच वर्षात पाच पीएम म्हणजे दरवर्षी एक पंतप्रधान करणार असल्याचे इंडिया आघाडीचे नेते सांगत आहेत. म्हणजे ते एका वर्षात एक पीएम. एका वर्षात तो जेवढी लूट करू शकतो, तेवढी लूट करेल. अशा लोकांच्या हातात तुम्ही देश देणार का? असा प्रश्न नरेंद्र मोदी यांनी उपस्थित मतदारांना विचारला आहे.
लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या आणि चौथ्या टप्प्यात बारामती, माढा आणि सातारा या अत्यंत प्रतिष्ठेच्या मतदारसंघांमध्ये मतदान होणार असून महायुतीच्या उमेदवारांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आणि उद्या प्रचारसभा घेणार आहेत. दोन दिवसांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एकूण 6 सभा होणार असून यात आज पुणे, कराड आणि सोलापुरात सभा होणार आहेत. तर उद्या मंगळवारी, 30 एप्रिल रोजी माढा मतदारसंघातील माळशिरस, त्यानंतर धाराशिव आणि लातूर येथे सभा होणार आहेत. राज्यात इतक्या सलग सभा घेण्याची ही मोदींची पहिलीच वेळ आहे.