सोलापूर : वृत्तसंस्था
माळशिरसमध्ये झालेल्या सभेत देवेंद्र फडणवीस यांनी मोहिते पाटलांवर सडकून टीका केली होती. याच टीकेला मोहिते पाटलांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. प्रसंगी तुरूंगवास पत्करेन पण सत्ताधाऱ्यांच्या दबावाला भीक घालणार नाही असा पलटवार माढा लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार धैर्यशील मोहिते-पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केला आहे.
करमाळा तालुक्यातील विविध भागात आयोजित प्रचार सभांमध्ये मोहिते-पाटील यांनी आक्रमक भाषण केले. ”माढा लोकसभा निवडणुकीत उभे राहिल्यापासून आपणांवर सत्ताधाऱ्यांकडून सातत्याने दबाव येत आहे. परंतु असा कितीही दबाव येऊ द्या, आपण त्यास अजिबात भीक घालणार नाही. घाबरविण्याचा कितीही प्रयत्न केला तरी अजिबात घाबरणार नाही. शेवटी मी शंकरराव मोहिते-पाटील यांचा नातू आहे”, असे मोहिते पाटील यांनी म्हंटले आहे.
पुढे ते म्हणाले, ”खोटेनाटे आरोप करून खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकाविण्याचा प्रयत्न होत आहे. लोकसभा निवडणुकीत असा दबाव आणि त्रास वाढणार असल्याची जाणीव आहे. परंतु अशा कोणत्याही दबावाला भीक घालणार नाही. प्रसंगी तुरूंगात जाणे पत्करेन”, असा इशारा मोहिते पाटील यांनी दिला आहे.
तसेच पुढे ते म्हणाले, ”मी कुटुंबात माझे आई-वडील आणि पत्नीसह दोन मुलींना सांगितलं होते की,इलेक्शन झाल्यानंतर मला अनेक गोष्टींना तोंड द्यायची वेळ येणार आहे आणि माझी काहीही तयारी आहे. मोहिते पाटील कुटुंबावर प्रेम करणाऱ्या सोलापूर जिल्ह्यातील सर्वसामान्य जनतेसह शेतकर्यांसाठी काय पण किंमत मोजेल, आत बसण्याची तयारी देखील ठेवली”, असे मोहिते यांनी म्हंटले आहे.
तसेच त्यांनी शरद पवार गट आणि शिंदे गटावर निशाणा साधला आहे. ”आज तुम्ही घरमालकाला सुद्धा बाहेर काढून घर बळकावण्याचे काम करत आहेत. उतारा त्यांच्या नावावर, घर त्यांच्या नावावर आणि तुम्ही ते घर त्यांचे नाही म्हणून सांगता”, असे म्हंटले आहे. तसेच ”फडणवीस हे साडेसात वर्षे राज्याचे गृहखाते सांभाळत आहेत. आता सरकारमधून जायची वेळ आली असताना तुम्हाला माळशिरसमधील गुंडगिरी, दहशतवाद कसा दिसतो?”, असा खोचक सवालही त्यांनी केला आहे.