ध्यास विश्वसार्ह बातमीचा

थेट पंतप्रधान मोदींनी दिली शरद पवारांना ऑफर !

नंदुरबार : वृत्तसंस्था

शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी आत्मसन्मान गमावून त्यांचे पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करण्यापेक्षा सन्मानाने अजित पवार व एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील पक्षांत विलीन करावे, असा सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी नंदुरबार येथील जाहीर सभेत दिला.

नंदुरबार लोकसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार डॉ. हीना गावीत यांच्या प्रचारासाठीच्या या सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आदिवासी विकासमंत्री डॉ. विजयकुमार गावीत, मदत व पुनर्वसनमंत्री अनिल भाईदास पाटील, आमदार अमरीशभाई पटेल, भाजपचे प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांच्यासह धुळे-नंदुरबार जिल्ह्यातील महायुतीचे पदाधिकारी व आमदार व्यासपीठावर उपस्थित होते.

आपल्या ३७ मिनिटांच्या भाषणात मोदी यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचा समाचार घेतला, बाळासाहेब ठाकरे यांच्याशी आपले मनाचे आणि हृदयाचेही नाते होते; परंतु त्यांचे सपत्र जेव्हा चारा घोटाळा करणारे आणि बॉम्बस्फोट घडविणाऱ्यांसोबत जाऊन मोदीला जिवंत गाडण्याची भाषा करतात तेव्हा दुःख होते, असे ते म्हणाले.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचा नकली राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचा नकली शिवसेना असा उल्लेख त्यांनी केला. ते म्हणाले की, बारामतीच्या निवडणुकीनंतर चिंतीत झालेल्या शरद पवारांनी निराश होऊन छोटे पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील, असे म्हटले आहे.
याचाच अर्थ शरद पवार यांची नकली राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे यांची नकली शिवसेना ४ जूननंतर काँग्रेसमध्ये विलीन होण्याची शक्यता आहे. त्यांनी आत्मसन्मान गमावून काँग्रेससोबत जाण्यापेक्षा, सन्मानाने अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यासोबत येऊन काम करावे, असा सल्लाही त्यांनी दिला. दलित, आदिवासी आणि ओबीसींसाठीच्या आरक्षणाची धर्माच्या आधारावर विभागणी करण्याचे कारस्थान काँग्रेसने रचले असून, ते आपण जिवंत असेपर्यंत पूर्णत्वास जाऊ देणार नसल्याचे सांगत, दलित, आदिवासी आणि ओबीसींच्या आरक्षणासाठी चौकीदार म्हणून काम करणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!