ध्यास विश्वसार्ह बातमीचा

अक्कलकोट : भीमा नदीत बुडून दोन अल्पवयीन मुलींचा दुर्देवी मृत्यू

अक्कलकोट : प्रतिनिधी

तालुक्यातील म्हैसलगी येथे भीमा नदी पात्रात कपडे धुण्यासाठी आईसोबत गेलेल्या मुलीसह बहिणीचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. आरती भीमराव निकंबे (वय १४) व रुपाली कुमार माने (वय ८, रा. म्हैसलगी) असे मृत झालेल्या दोन मुलींची नांवे आहेत. दक्षिण पोलीस ठाण्यात याबाबतची फिर्याद किरण भीमराव निकंबे यांनी दिली.

मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवार, १० मे रोजी दुपारी १.३० च्या सुमारास फिर्यादी किरण निकंबे यांची मोठी बहीण शोभा कुमार माने, लहान बहीण आरती भीमराव निकंबे व भाची रुपाली कुमार माने या तिघीजणी घराशेजारीच असलेल्या भीमा नदीच्या पात्रातील पाण्यात कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या. काही वेळाने शोभा कुमार माने ह्या मुली पाण्यात बुडत असल्यामुळे मदतीसाठी हाका मारु लागल्या. त्यावेळी लागलीच फिर्यादी किरण, गावातील सिद्धाराम भीमाशंकर बऱ्हाणपुरे, दशरथ चंद्रकांत शिंगे, अनिल भीमाशंकर कोळी, कोंडीबा भीमशा भुई असे सर्वजण तिथे पोचले. त्यावेळी शोभा हिने सांगितले की, मी व बहीण आरती कपडे धुवत असताना मुलगी रुपाली ही खेळत खेळत पाण्यात जाऊन बुडू लागली. त्यावेळी तिला वाचवण्यासाठी आरती भीमराव निकंबे ही पाण्यात गेली असता दोघीही पाण्यात बुडाल्या. गावातील अनिल भीमाशंकर कोळी व कोंडीबा भीमशा भुई या दोघांनी पाण्यात उडी मारून नदी पात्रातून त्या दोघींना पाण्याबाहेर काढले.

त्यांना तात्काळ अॅम्ब्युलन्समधून ग्रामीण रुग्णालय अक्कलकोट येथे दाखल केले असता तेथील डॉक्टरांनी दोघींचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे सांगितले. मोठी बहीण शोभा कुमार माने (रा. हंजगी, ता. अक्कलकोट) हिची मुलगी रुपाली ही लहानपणापासूनच म्हैसलगी येथे मामाकडेच राहण्यास होती. बहीण शोभा ही आमचे गावातील यात्रेकरिता १५ दिवसांपूर्वी हंजगी येथून म्हैसलगी येथे आली होती. अधिक तपास हवालदार धायगोडे हे करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!