ध्यास विश्वसार्ह बातमीचा

जालना, बीड,औरंगाबादेत साठीच्यावर मतदान

छत्रपती संभाजीनगर: वृत्तसंस्था

लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात सोमवारी (दि.१३) औरंगाबाद मतदारसंघात सरासरी ६०.२ टक्के, जालना मतदारसंघात ६५.६६ टक्के, तर बीड मतदारसंघात ६८ टक्के मतदानाची नोंद झाली. याबरोबरच केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, डॉ. कल्याण काळे, पंकजा मुंडे, बजरंग सोनवणे, संदिपान भुमरे, चंद्रकांत खैरे, इम्तियाज जलील यांचे भवितव्य ईव्हीएम बंद झाले. तिन्ही मतदारसंघात शांततेत मतदान पार पडले.
औरंगाबाद मतदारसंघात पहिल्या दोन तासांत ६.३३ टक्के मतदान झाले.

त्यानंतर हा आकडा वाढत गेला. मतदान संपेपर्यंत सरासरी ६०.०२ टक्के मतदान झाले. ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरी भागात मतदानासाठी रांगा लागल्या होत्या. या मतदारसंघात महायुतीचे संदिपान भुमरे, उद्धव सेनेचे चंद्रकांत खैरे आणि एमआयएमचे विद्यमान खासदार इम्तियाज जलील यांच्यात तुल्यबळ लढत झाली. मतदार यादीत नाव नसल्याने अनेकांना मतदानापासून वंचित राहावे लागले. वैजापूर तालुक्यात सर्वाधिक म्हणजे ५६.२९ टक्के मतदानाची नोंद झाली.

जालना लोकसभा मतदारसंघात भाजपचे रावसाहेब दानवे आणि काँग्रेसचे डॉ. कल्याण काळे यांच्यात सरळ लढत झाली. सायंकाळी सहा वाजेपर्यंत ६५.६६ टक्के मतदान झाले. भोकरदन तालुक्यात सर्वाधिक म्हणजे सरासरी ६५ टक्के मतदान झाले. बीड मतदारसंघात भाजपच्या पंकजा मुंडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे बजरंग सोनवणे यांच्यात थेट लढत होत असल्याचे चित्र आहे. बीड जिल्ह्यात गतवेळच्या तुलनेत यंदा मतांचा टक्का २ टक्क्यांनी वाढला असून सायंकाळी सहा वाजेपर्यंत सरासरी ६८ टक्के मतदान झाले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!