मुंबई : वृत्तसंस्था
मुंबईसह ठाणे परिसरातील लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी २० मे रोजी मतदान होणार आहे. देशातील पाचव्या व राज्यातील शेवटच्या टप्प्यात उद्धव ठाकरेंची मुंबईत व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ठाणे जिल्ह्यात प्रतिष्ठा पणाला लागली आहे. दोन्ही सेनेने मुंबई व ठाण्यात जोर लावल्याचे दिसून येते. त्यातच गुरुवारी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे डोंबिवलीत प्रचारानिमित्त आमने-सामने येणार आहेत.
कल्याण लोकसभा मतदारसंघ हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र डॉ. श्रीकांत शिंदे यांचा मतदारसंघ आहे. डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रचार रॅलीत गुरुवारी संध्याकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महायुतीचे अनेक बडे नेते सहभागी होणार आहेत. डोंबिवली पूर्वेतील नांदिवली येथून ही प्रचार रॅली सुरू होऊन संपूर्ण शहरात फिरणार आहे. त्याच दिवशी ठाकरे यांच्या कल्याण लोकसभा मतदारसंघातील उमेदवार वैशाली दरेकर यांच्यासाठी डोंबिवली पश्चिमेतील भागशाळा मैदानात जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेला पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व शिवसेनेचे बडे नेते उपस्थित राहणार आहेत. कल्याण लोकसभा मतदारसंघातून डॉ. श्रीकांत शिंदे यांनी यापूर्वी सलग दोन वेळा विजय मिळवला आहे. ठाकरे यांच्या सेनेच्या उमेदवार वैशाली दरेकर यांनी बऱ्यापैकी आव्हान उभे केल्याने याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.