ध्यास विश्वसार्ह बातमीचा

जरांगे पाटलांचे पुन्हा उपोषण ; पोलिसांनी परवानगी नाकारली

मुंबई : वृत्तसंस्था

देशात लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून आता देशात पुन्हा एकदा पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी शपथ घेणार आहे तर राज्यात मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आरक्षणासाठी उपोषणाचे हत्यार उपसले आहे. मात्र त्यांच्या या उपोषणाला आता पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. मनोज जरांगे हे शनिवारपासून पुन्हा एकदा मराठा आरक्षणाच्या आमरण उपोषणाला बसणार होते. मात्र, पोलिसांनी आता त्यांना परवानगी नाकारल्याने आता जरांगे यांच्या भूमिकेकडे लक्ष आहे.

यापूर्वी मराठा आरक्षण आंदोलनाचे केंद्र असलेल्या आंतरवाली सराटीच्या गावकऱ्यांनीच मनोज जरांगे यांच्या आमरण उपोषणाला विरोध केला होता. चार दिवसांपूर्वी आंतरवालीच्या गावकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले होते. आंदोलनामुळे गावातील जातीय सलोखा बिघडत असल्याचे ग्रामस्थांनी या निवेदनात म्हंटले होते. गावात आणि परिसरात जातीय सलोखा बिघडत असल्याने उपोषणास परवानगी देऊ नये अशी मागणी ग्रामस्थांनी या निवेदनातून केली होती. या निवेदनावर 70 गावकऱ्यांच्या सह्या असल्याची माहिती समोर आली होती.

त्यानंतर आता पोलिसांकडूनही कायदा सुव्यवस्थेचे कारण देत उपोषणाला पोलिसांकडून परवानगी नाकारण्यात आली. दरम्यान, जातीय सलोखा बिघडण्याची शक्यता, तसेच ग्रामपंचायतच्या कामांना अडथळा आणि महिला आणि शालेय विद्यार्थ्यांना होणारा त्रास लक्षात घेता पोलिसांकडून मनोज जरांगे यांच्या उपोषणाला परवानगी नाकारण्यात आली आहे. याशिवाय, उपोषणाच्या जागेबाबत ग्रामसभेचे कोणतीही कागदपत्रं सादर न केल्यामुळे जरांगे पाटील यांना ही परवानगी नाकारण्यात आल्याची माहिती आहे. त्यामुळे याबाबत आता मनोज जरांगे नेमके काय भूमिका घेणार हे पाहणे महाव्ताचे असणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!