ध्यास विश्वसार्ह बातमीचा

बारुद कंपनीत मोठा स्फोट ; ५ जणांचा स्फोटात मृत्यू

नागपूर : वृत्तसंस्था

राज्यातील नागपूर शहरात स्फोटकं तयार करणाऱ्या कारखान्यात गुरुवारी दुपारी अचानक मोठा स्फोट झाला. या स्फोटावेळी अनेक कामगार फॅक्टरीत होते. सुरुवातीला मिळालेल्या माहितीनुसार, या कारखान्यात काम करणाऱ्या कामगारांपैकी 4-5 जणांचा स्फोटात मृत्यू झाला तर काही मजूर जखमी झाले आहेत. त्यांना तातडीने उपचारांसाठी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या आहेत. आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.

सविस्तर वृत्त असे कि, नागपूरमधील धामना परिसरातील चामुंडी बारुद कंपनीत दुपारी दीड वाजता हा भीषण स्फोट झाला. हा स्फोट इतका मोठा होता की, त्याचा आवाज कित्येक किलोमीटरपर्यंत ऐकू गेला. त्यानंतर या फॅक्टरीत भीषण आग लागली. त्याचा धूर कित्येक किलोमीटरवरुन दिसला. स्थानिक लोकांनी तात्काळ या स्फोटाची माहिती अग्निशमन दलाला दिली. या आगीत अडकलेल्या काही कामगारांना बाहेर काढण्यात यश आले. जखमींना रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे.

जवळपास दोन तासानंतर आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळविण्यात यश आले आहे. अजूनही कुठला अनर्थ होऊ नये यासाठी अग्निशमन दलाची वाहन घटनास्थळावर आहेत. आग विझविण्याचे काम सुरु आहे. जेव्हा स्फोट झाला, तेव्हा या कारखान्यात अनेक कामगार अडकले होते. यामध्ये काही महिलांचा पण समावेश आहे. मृत कामगारांमध्ये चार महिला असल्याचे सांगण्यात येत आहे. आग नेमकी कशामुळे लागली याची कारणे अद्याप समोर आलेली नाहीत. स्फोटाची माहिती मिळताच प्रशासकीय अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. धामनामध्ये झालेल्या स्फोटात सहा जखमींना दंदे रुग्णालयात आणण्यात आले होते. त्यापैकी पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. त्यांना तपासून शव विच्छेदनसाठी मेडिकल रुग्णालयात पाठविण्यात आले. तर एक रुग्णाची प्रकृती चिंताजनक असून त्याच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. आणखी काही जखमी रुग्ण येण्याची शक्यता आहे. जो रुग्ण आयसीयूमध्ये आहे त्याची स्थिती गंभीर आहे, असे दंदे हॉस्पिटलचे संचालक डॉ पिणाक दंदे यांनी सांगितलं.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!