मुंबई : वृत्तसंस्था
लोकसभा निवडणुकीत राज्यात महायुतीला मोठा फटका बसल्यानंतर आता भाजपने आतापासून तयारी विधानसभेची सुरु केली आहे. त्यासाठी विचारमंथनाच्या बैठका देखील झाल्या आहे. महाराष्ट्र सांभाळणे ही काही एकट्या देवेंद्र फडणवीस यांची जबाबदारी नाही. त्यामुळे सर्वच नेत्यांनी लक्ष घालावे आणि त्यांचे हात मजबूत करावे, असे आदेश भाजप श्रेष्ठींनी दिल्यानेच यंदा व्यापक कोअर कमिटी झाली, असा दावा महाराष्ट्रातील भाजप नेत्यांकडून करण्यात येत आहे.
अलीकडेच दिल्ली येथे भाजप नेत्यांनी महाराष्ट्रातील नेत्यांशी व्यापक मंथन केले होते. या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा देण्याची काहीच गरज नाही. ही त्यांच्या एकट्याची नाही, तर सामूहिक जबाबदारी आहे, पण दायित्व घेत ते पुढे आले, म्हणून पक्ष नेतृत्वाने त्यांचे कौतुक केले होते. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करूनच जागावाटपाचा फाॅर्म्युला तयार होणार असल्याचेही भाजपमधील सूत्रांनी सांगितले. दोन पक्ष सोबत घेत सरकार चालवण्याचे कसब फडणवीस यांच्याकडेच आहे. त्यामुळे त्यांनी तत्काळ विधानसभा निवडणुकीचे नियोजन करावे आणि त्या प्लॅनवर पक्षातील अन्य नेत्यांशी सल्लामसलत करावी, असे सांगण्यात आले होते. त्याच वेळी राज्यातील अन्य नेत्यांनी निष्क्रिय राहून चालणार नाही. फडणवीस काम करतात, म्हणजे महाराष्ट्र ही काही त्यांची एकट्याची जबाबदारी नाही. त्यात अन्य नेत्यांनी आपले प्रयत्न वाढवले तर महाराष्ट्रात विधानसभा जिंकण्यापासून आपल्याला कुणीही थांबवू शकणार नाही, असे सांगून केंद्रीय नेतृत्वाने या विधानातून पक्षातील इतर नेत्यांना संदेश दिल्याची माहिती आहे.
या बैठकीत दिलेल्या आदेशानुसार, आपली रणनीती निश्चित करून शिंदे, अजित पवार यांच्यासोबत जागावाटप फॉर्म्युला लगेच निश्चित करा आणि रणनीतीचे बारकाईने नियोजन करा, असे केंद्रीय नेतृत्वाचे फडणवीसांना आदेश होते. केंद्रीय नेतृत्व भक्कमपणे फडणवीस यांच्या पाठीशी उभे आहे, हाच संदेश दिल्लीतील बैठकीतून देण्यात आला होता. त्यामुळेच कोणी कोणत्याही पदावर असो, महाराष्ट्रात फडणवीस यांच्यासोबत ठामपणे उभे राहा, असे केंद्रीय नेत्यांनी स्पष्ट केले.