ध्यास विश्वसार्ह बातमीचा

शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यासाठी राजू शेट्टी मैदानात

पुणे : वृत्तसंस्था

शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यासाठी राज्यात १ जुलैपासून वसंतराव नाईक शेतकरी कर्जमुक्ती आंदोलन सुरू करणार आहे. या आंदोलनाची सुरुवात पुसद (जि. यवतमाळ) येथून करणार आहे. शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यासाठी सरकारला गुडघे टेकायला भाग पाडू, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दिला. बारामती (जि. पुणे) येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राज्य कार्यकारिणीच्या समारोप बैठकीत ते बोलत होते.

शेट्टी म्हणाले, शेतकऱ्यांची कर्जमुक्ती झाल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही. १ जुलैपासून मी राज्यव्यापी दौरा काढून पुन्हा नव्याने आंदोलन सुरू करत आहे. शेतकरी आणि शेतमजुरांच्या मुलांची लग्ने होताना अडचणी येत आहेत. त्यांच्या आर्थिक परिस्थितीमुळे लग्ने होत नाहीत. त्यासाठी सरकारने ५ लाख रुपये स्त्रीधन म्हणून द्यावे. तसेच नवविवाहित जोडप्यांना स्वयंरोजगारासाठी २५ लाख रुपयांचे कर्ज वाटप करावे, अशी आमची मागणी आहे.

स्वाभिमानी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जालंधर पाटील म्हणाले, निवडणुका आम्ही स्वबळावर लढलो. आम्ही स्वस्थ बसणार नाही, पुन्हा उठू व लढू. यावेळी सतीश काकडे, संदीप जगताप, प्रकाश पोपळे, राजेंद्र गड्यान्नावर, प्रकाश बालवाडकर, अनिल पवार, अमर कदम, दामोदर इंगोले, किशोर ढगे, प्रशांत डिक्कर, प्रभाकर बांगर, जनार्दन पाटील, पोपट मोरे, बापू कारंडे, संदीप राजोबा, महेश डुके आदी उपस्थित होते.

राज्य सरकारने शेतकऱ्यांवर वरवंटा फिरवू नये. तातडीने एफआरपी व भूमिअधिग्रहण कायद्यातील केलेली दुरूस्ती मागे घ्यावी. दूध उत्पादकांची लूट सुरूच आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात दूध पावडरचे दर कमी होऊ लागले आहेत. दूध उत्पादक शेतकऱ्यांना तातडीने प्रतिलिटर ७ रुपये अनुदान खात्यावर वर्ग करावे, अन्यथा १० जुलै रोजी १ दिवसाचे दूध बंद आंदोलन करू. शेतकरी आर्थिक अरिष्टात सापडला आहे. महायुती व महाविकास आघाडीचे शेतकऱ्यांवरील प्रेम निवडणुकीपुरतेच होते. निवडणुका संपल्या व त्यांची गरज संपली. त्यांनी पुन्हा शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!