अहमदनगर : वृत्तसंस्था
राज्यात मराठा – ओबीसी आरक्षणाचा वाद सुरु असतांना आता राज्यातील शेतकरी दुध दरासाठी आक्रमक झाल्याचे दिसून आले आहे. दुधाला ४० रुपये दर अपेक्षित असताना २२ ते २५ रुपये दर मिळतो. हा सरकारने टाकलेला दरोडा आहे; असा आरोप करत शेतकऱ्यांनी दूध दरासाठी अहमदनगर जिल्ह्यातील कोल्हार- घोटी राजमार्गावर रास्ता रोको आंदोलन सुरु केले.
दर वाढीसाठी दूध उत्पादक शेतकरी आक्रमक झाले असून आज संगमनेर तालुक्यातील चिखली या गावात झालेल्या या आंदोलनात मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले होते. शेतकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करत दुधाला किमान ४० रुपये दर करावा अशी मागणी केली.
मात्र एकीकडे शेतकरी दूध दरवाढीवरून आक्रमक झाले असताना दुसरीकडे केंद्र सरकारने १० हजार टन दूध पावडर आयात करण्यासाठी परवानगी दिली आहे. हा दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या जखमेवर मिट चोळण्याचा प्रकार असल्याचे म्हणत शेतकऱ्यांनी या निर्णयाचा निषेध केला. सरकारने आगोदर राज्यातील दूध भेसळ रोखवी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली.
शेतकऱ्यांच्या प्रश्नांसंदर्भात उद्या दुग्ध विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी बैठक बोलावली आहे. मात्र या बैठकीत शेतकरी प्रतिनिधी न बोलावता केवळ शेतकऱ्यांचे नेते म्हणवणाऱ्याना निमंत्रित करण्यात आल्याने ही बैठक आम्हाला मान्य नाही; अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे. दरम्यान मागण्या मान्य झाल्या नाही तर सर्व सरकारी कार्यालयांसह मंत्रालयात शेण ओतून तीव्र स्वरूपाचे आंदोलन करू; असा इशारा दूध उत्पादक शेतकऱ्यांनी दिला आहे.