ठाणे : वृत्तसंस्था
राज्यातील किल्ले प्रतापगड मोहीम यशस्वी झाल्यानंतर ठाणे जिल्ह्यातील श्री मलंगगडाच्या मोहिमेस सुरुवात झाली आहे. गडावरील अतिक्रमण हटविण्यात सुरुवात करण्यात आली आहे. गुरुवारी (दि.४) पहाटे चार वाजल्यापासून अतिक्रमण पाडण्यास सुरुवात करण्यात आली आहे. या कारवाईत तब्बल ६०० पेक्षा अधिक कर्मचारी सहभागी असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये, यासाठी प्रशासनाकडून वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे.
अंबरनाथ तालुक्यातील श्री मलंगगडावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण वाढत चालली होती. या वाढलेल्या अतिक्रमणामुळे मोठ्या प्रमाणात बाहेरील वस्ती देखील झपाट्याने गडावर वाढत होती. मात्र, या प्रकरणाकडे प्रशासनाकडून कानाडोळा केला जात असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत होती. मात्र, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उसाटने येथे श्री मलंगगडाच्या बाबतीत जे तुमच्या मनात आहे, ते माझ्या मनात असल्याचे त्यांनी सांगितले होते. यानंतर खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी देखील श्री मलंगगडा संदर्भात विधान केले होते. यानंतर आता श्री मलंगगडावर कारवाईला सुरुवात करण्यात आली आहे.
आज पहाटेपासून अतिक्रमण काढण्यास सुरुवात करण्यात आली आहे. या कारवाई साठी जिल्ह्यातील सर्व वनविभागाचे कर्मचारी, महसूल विभागाचे कर्मचारी त्यासोबत उल्हासनगर, अंबरनाथ नगरपालिकेचे अतिक्रमण विभागाचे कर्मचारी श्री मलंगगडावर कारवाई करत आहेत. या कारवाईसाठी महसूल विभागाच्या वतीने उप विभागीय अधिकारी उल्हासनगर, तहसीलदार अंबरनाथ, पोलीस उपायुक्त तसेच अतिरिक्त पोलिसांचे मनुष्यबळ तैनात करण्यात आले आहे. त्यामुळे विशाळगडनंतर श्री मलंगगडाची मोहीम यशस्वी होते का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.