मुंबई : वृत्तसंस्था
राज्यात गेल्या काही महिन्यापासून मराठा-ओबीसी आरक्षण वाद सुरु असल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा-ओबीसी आरक्षण वादाबाबत सर्वपक्षीय नेत्यांच्या आयोजित केलेल्या बैठकीवर विरोधकांनी बहिष्कार टाकला. त्यामुळे महाराष्ट्र पेटता राहिला पाहिजे आणि त्यावर आपली राजकीय पोळी भाजता आली पाहिजे, अशी विरोधकांची भूमिका असल्याची टीका देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी केली होती.
दरम्यान याच वादावरून महायुतीतील सत्ताधारी आमदारांनी विधानसभेत विरोधकांना घेरण्याचा प्रयत्न केला. आमदार नीतेश राणे, आशिष शेलार, सुरेश कुटे, अमित साटम यांनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधत कुणाच्या सांगण्यावरून ‘बहिष्कार’ टाकल्याचा सवाल उपस्थित केला. यावेळी महायुतीच्या आमदारांनी विधानसभा अध्यक्षांसमोर असलेल्या मोकळ्या जागेत जोरदार घोषणाबाजी केली. यानंतर अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी तीनवेळा सभागृह तहकूब करण्याची वेळ आली. नीतेश राणे म्हणाले की, विरोधी पक्षातील नेते वाद निर्माण करत आहे. मविआच्या नेत्यांनी मराठा समाजाला कसे आरक्षण मिळावे हे जाहीर केले पाहिजे. समाजाच्या तरुणाचे भविष्य आंधारात घालण्याचा प्रयत्न सुरू आहे, असा आरोप राणेंनी विरोधकांवर केला आहे.
संजय कुटे यांनी सगेसोयऱ्याच्या बैठकीला विरोधीपक्ष उपस्थित न राहिल्याने सभागृहात आक्रमक पवित्रा घेतला. मविआतील तिन्ही पक्षांनी मराठा समाजाला ओबीसीत घ्यावे की नाही या बाबत भूमिका जाहीर करावी असे म्हटले आहे. तर मविआला केवळ राजकारण करायचे आहे, अशी टीका केली आहे.