पंढरपूर (सोलापूर) : पंढरपूर तालुक्यातील 94 ग्रामपंचायतींच्या नवीन प्रभाग रचना करण्यात आल्या आहेत. त्यानंतर निवडणुकीच्या अनुषंगाने निवडणूक आयोगाच्या गाइड लाइननुसार प्रारूप मतदार याद्या तयार करून त्या प्रसिद्धही करण्यात आल्या आहेत. परंतु प्रारूप मतदार याद्यांमध्ये अनेक गंभीर स्वरूपाच्या चुका आढळून आल्याने याद्यांसंदर्भात तक्रारींचा पाऊस सुरू झाला आहे. ओझेवाडी येथील प्रारूप यादीसंदर्भात तक्रार दाखल झाली आहे. निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्यापूर्वीच गावोगावी निवडणुकांचा माहोल तयार होऊ लागला आहे.
ओझेवाडी (ता. पंढरपूर) येथे मतदार राहतात एका प्रभागामध्ये तर त्यांची नावे अन्य प्रभागातील याद्यांमध्ये आल्याने मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. प्रभाग रचनेच्या वेळी येथील ग्रामस्थांनी आक्षेप नोंदवला होता. त्यानंतर आता प्रारूप मतदार यादी संदर्भात येथे आक्षेप नोंदवले गेले आहेत. येथील शहाजी नागणे, अनिल वाघमोडे, भास्कर गायकवाड, दिलीप जाधव आदींनी प्रारूप मतदार याद्यांवर आक्षेप घेत तहसीलदार तथा निवडणूक निर्णय अधिकारी वैशाली वाघमारे यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली आहे.
तालुक्यातील अनेक गावांमध्ये प्रारूप मतदार यांद्यावरून तक्रारी सुरू झाल्या आहेत. निवडणुकीपूर्वीच प्रारूप मतदार याद्यांवरून राजकारण तापू लागले आहे. निवडणूक निर्यण अधिकारी कशा पद्धतीने याद्यांचा वाद निकाली काढतात, याकडेच लक्ष लागले आहे.