मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील अनेक जिल्ह्यात पावसाचे वातावरण असून गेल्या २४ तासांत कोकण आणि गोव्यातील काही भागांत मुसळधार पावसाची नोंद झाली आहे. तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस झाला आहे. दरम्यान, कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रात पुढील ४ दिवस पावसाचे राहणार आहेत. १२ ते १५ जुलै दरम्यान कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या किनारी भागांत मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. दरम्यान, पालघर, सिंधुदुर्ग, नाशिक, कोल्हापूरमध्ये उद्या शुक्रवारी जोरदार पावसाची शक्यता असल्याने यलो अलर्ट जारी केला आहे.
उत्तर कोकणातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. कोकणातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे. मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांच्या घाट भागात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वाऱ्यासह मध्यम पाऊस पडणार असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. तर ईशान्येकडील राज्यांत पुढील २ दिवसात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यानंतर त्याची तीव्रता कमी होणार असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.