युवक काँग्रेसने विधानसभेसाठी जोमाने कामाला लागावे : म्हेत्रे
युवक काँग्रेसचे अध्यक्ष बाबासाहेब पाटील यांचा राजीनामा मागे
अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर युवक काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे कार्यकर्त्यांवर कुठल्याही पद्धतीचा अन्याय होऊ देणार नाही,अशी ग्वाही माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांनी दिली.
दोन दिवसापूर्वी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी अचानकपणे राजीनामा दिला होता.या पार्श्वभूमीवर माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांनी तातडीने मल्लिकार्जुन पाटील यांच्या निवासस्थानी युवक काँग्रेसच्या सर्व पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती.यावेळी पाटील यांची नाराजी दूर करत पुन्हा नव्याने जोमाने
कामाला लागण्याचे आवाहन म्हेत्रे यांनी केले.
लोकसभा निवडणुकीत ज्या पद्धतीने युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी उत्साहाने व चुरशीने पक्षाच्या विजयासाठी काम केले.त्याच पद्धतीने विधानसभा निवडणुकीसाठी देखील आपण सर्वांनी मिळून एक दिलाने काँग्रेस पक्षाचे काम करावे,असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.बाबासाहेब पाटील एक काँग्रेसचे कट्टर कार्यकर्ते आहेत त्यांच्यासारख्या कार्यकर्त्याची पक्षाला गरज आहे. त्यांची ओळखच तालुक्यात एक काँग्रेसचा सच्चा कार्यकर्ता म्हणून आहे.हे विसरून चालणार नाही. त्यांच्यावर
कुठल्याही पद्धतीचा अन्याय होऊ देणार नाही त्यांच्यावरही या पुढच्या काळात जबाबदारी दिली जाईल.याबाबत काही लोकांना समज देऊ, असेही म्हेत्रे यांनी
यांनी सांगितले.अक्कलकोट तालुक्यात नुकत्याच झालेल्या चपळगाव व अक्कलकोट येथील कृतज्ञता मेळाव्यात युवक काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना विश्वासात
घेतले गेले नाही,अशी तक्रार पदाधिकाऱ्यांनी यावेळी केली.
यापुढे असा प्रकार होऊ देणार नाही.स्थानिक लोकांकडून असा विषय झाला असेल पण यापुढे असे होऊ देणार नाही,अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.यावेळी बोलताना पाटील म्हणाले की, म्हेत्रे हे आमचे नेते आहेत. आम्ही काँग्रेस सोडून कसल्याही परिस्थितीत जाऊ शकत नाही.अंतर्गत थोडासा विषय झाला होता परंतु तो पूर्णपणे आता संपलेला आहे. पक्षानेही माझा राजीनामा मंजूर केलेला नाही आणि मीही माघार घेत आहे, पुन्हा मला पक्षाने राजीनामा नामंजूर केल्याचे पत्र दिले आहे.विधानसभा निवडणुकीसाठी जोमाने कार्य करू,असे त्यांनी सांगितले.यावेळी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुनंजय पवार यांच्या स्वाक्षरीचे राजीनामा ना मंजुरीचे पत्र म्हेत्रे यांच्या हस्ते देण्यात आले.यावेळी जि.प सदस्य मल्लिकार्जुन पाटील,सुनील खवळे,विनीत पाटील, मुजीप नदाफ, इरण्णा धसाडे, राहुल साळुंखे,अयाज चंदनवाले,हमीद गिलकी, आकाश निंगदळे, राहुल मोरे, वसीम कुरेशी, काशीनाथ लोड्डेनौरु, रतन बिराजदार, नितीश राठोड, संदीप चव्हाण,बालाजी शापवाले आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
विधानसभा निवडणुकीत यश मिळेल
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला घवघवीत यश मिळाले आहे. विधानसभा निवडणुकीतही आपल्याला यश मिळेल. कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी जुने गट, नवे गट हा वाद विसरून एक दिलाने सर्वांनी मिळून महाविकास आघाडीच्या विजयासाठी प्रयत्न करावे.
– सिद्धाराम म्हेत्रे,माजी मंत्री