पुणे : वृत्तसंस्था
राज्याच्या राजकारणातली सर्वात मोठी राजकीय बातमी समोर आली आहे. राज्याचे मंत्री छगन भुजबळ हे शरद पवार यांच्या भेटीसाठी पोहोचले आहेत. या भेटीचे कारण अद्याप गुलदस्त्यात आहे. मात्र सध्या राज्यात आरक्षणाचा मुद्दा तापेलला असताना या भेटीत हाच मुद्दा चर्चेच्या केंद्रस्थानी असेल असा तर्क लावला जात आहे. विशेष म्हणजे भुजबळ अचानक पवारांच्या भेटीला पोहोचल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
कारण रविवारी बारामतीमध्ये झालेल्या अजित पवार गटाच्या सभेत मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून भुजबळ यांनी शरद पवार यांच्यावर गंभीर आरोप केले होते. राज्यातले एक ज्येष्ठ नेते म्हणून आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावण्याचे सोडून विरोधी पक्षांना काहीही सल्ले दिले जात आहेत. आरक्षणाच्या आडून महाराष्ट्र पेटवण्याचे काम काही लोक करत आहेत. तसेच बारामतीमधून फोन आला म्हणून विरोधी पक्षनेते मराठा आरक्षणाच्या सर्वपक्षीय बैठकीला आले नाहीत”, असे अनेक गंभीर आरोप भुजबळांनी केले होते. त्यांच्या या विधानानंतर दुसऱ्याच दिवशी ते पवारांच्या भेटीला गेल्याने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून छगन भुजबळ हे ओबीसी आरक्षणामुळे चर्चेत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार शरद पवार यांची प्रकृती ठीक नाही. ते कोणाचीही भेट घेत नाहीयेत. पण शरद पवार यांनी छगन भुजबळ यांना भेटीची वेळ दिली आहे. त्यामुळेच भुजबळ हे सिल्व्हर ओकवर पोहोचले आहेत. मात्र गंभीर आरोप केल्यानंतर आता या दोघांमध्ये नेमकी काय चर्चा होते? ते पाहणे महत्वाचे आहे.