पुणे : वृत्तसंस्था
राज्यात मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणांवरून वातावरण तापले आहे. राज्यात अशांत वातावरण असल्याने राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी आज दि. १५ राष्ट्रवादीचे अध्यक्ष व ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली. यावेळी सुमारे दीड तास चर्चा झाल्याचे भुजबळ यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. यावर चर्चा झाली. त्याचबरोबर मराठा – ओबीसी वाद मिटविण्यासाठी पुढाकार घेण्याची विनंती पवारांना केली. यावर त्यांनी सकारात्मकता दाखवत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून मार्ग काढू, असे पवारांनी सांगितल्याचे भुजबळ यांनी सांगितले.
मराठा आणि ओबीसी समाजामध्ये गावागावांमध्ये तणावपूर्ण वातावरण बनले आहे. त्यामुळे राज्याचे एक ज्येष्ठ नेते म्हणून तुम्ही लक्ष घालावे, अशी विनंती पवारांना केली. औरंगाबाद येथील मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यावरून वाद निर्माण झाला होता. यावेळी शरद पवार मुख्यमंत्री होते. त्यांनी यावेळी सत्ता गेली तरी चालेल, अशी भूमिका घेत विद्यापीठाला डॉ. आंबेडकरांचे नाव देण्याचा निर्णय घेतला. आताही मराठा आणि ओबीसी आरक्षणावरून निर्माण झालेल्या परिस्थितीवर अशी ठाम भूमिका घेण्याची गरज असल्याचे पवारांना सांगितले.
ते पुढे म्हणाले की, शरद पवारांच्या भेटीसाठी परवानगी घेतली नव्हती. त्यांची तब्बेत ठीक नाही. त्यांनी बेडवरूनच माझ्याशी चर्चा केली. पक्षीय भूमिका घेऊन त्यांची भेट घेतली नाही किंवा एक मंत्री म्हणूनही भेट घेतली नाही. तर ओबीसी, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा केली. महाराष्ट्र अशांत ठेवणे योग्य ठरणार नाही, महाराष्ट्राची सामाजिक परिस्थिती काय आहे, याची जाणीव तुम्हाला आहे. राज्यातील परिस्थिती चांगली नाही, तंग वातावरण शांत व्हावे, प्रश्न सोडावावा, यासाठी तुम्ही पुढाकार घ्यावा, अशी विनंती त्यांना केल्याचे भुजबळांनी सांगितले. यावर मराठा ओबीसी आरक्षणावरून झालेल्या परिस्थितीवर दोघांमध्ये सकारात्मक चर्चा झाली. मुख्यमंत्र्यांशी बोलून काय करता येईल का, यावर चर्चा करण्यास तयार आहे, अशी सकारात्मकता पवारांनी दाखविल्याचे भुजबळांनी यावेळी सांगितले.