ध्यास विश्वसार्ह बातमीचा

पंढरपूर जाणाऱ्या खाजगी बसचा भीषण अपघात : ५ ठार ४२ जखमी

मुंबई : वृत्तसंस्था

राज्यातील अनेक भाविक आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर येथे जात असतांना नुकतेच मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. डोंबिवलीतून पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांच्या खासगी बसने ट्रॅक्टरला जोरदार धडक दिली. या अपघातात पाच वारकऱ्यांचा जागीच मृत्यू झाला, तर ४२ जण जखमी झाले. सोमवारी मध्यरात्री पावणे एकच्या सुमारास हा अपघात झाला. जखमींवर पनवेल येथील एमजीएम आणि उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

हौसाबाई पाटील रा. घेसर, गुरुनाथ महाराज पाटील रा. नारिवली, रामदास नारायण मुकादम रा. नावाळी, अशी मृत वारकऱ्यांची नावे आहेत. अपघातानंतर मुंबई एक्स्प्रेस हायवेची मुंबई-लोणावळा लेन तीन तास बंद होती. क्रेनच्या मदतीने बस बाहेर काढण्यात आल्यानंतर पुन्हा वाहनांची वाहतूक सुरू झाली आहे.

नवी मुंबईचे डीसीपी विवेक पानसरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आषाढी एकादशीनिमित्त वारकरी खासगी बसमधून पंढरपूरला जात होते. यादरम्यान बस ट्रॅक्टरला धडकून खड्ड्यात पडली. यामध्ये डॉक्टरांनी ५ जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी केली आहे. तर ४२ जण जखमी झाले आहेत. त्यांना एमजीएम रुग्णालयात हलवण्यात आले असून ३ जणांवर सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

डोंबिवली वरून ४ ट्रॅव्हल्स रात्री निघाल्या होत्या. रात्री पावणे एकच्या दरम्यान महामार्गावर ट्रॅव्हल्स पोचली असता बस आणि ट्रक्टरची धडक झाली. बस धडकल्यानंतर चालकाचा ताबा सुटल्याने बस महामार्गावरून ३० ते ४० फुट खोल खड्यात पडली. बसमधील ५४ भाविकांपैकी ५ भाविकांचा जागीच मृत्यू झाला, तर ४२ भाविक जखमी झाले. त्यांच्यावर एमजीएम रुग्णालयात उपचार सुरु असून काही जखमींची प्रकृती चिंताजनक आहे. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. जखमींच्या नातेवाईकांनी अपघाताची माहिती मिळताच रुग्णालय परिसरात मोठी गर्दी केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!