ध्यास विश्वसार्ह बातमीचा

शेतकऱ्यांना आनंदाची बातमी : उजनी धरण आले प्लसमध्ये !

पुणे : वृत्तसंस्था

राज्यातील अनेक जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरु असून अनेक ठिकाणच्या नद्या मोठ्या प्रमाणात वाहू लागल्या आहे. पुणे-सोलापूर आणि अहमदनगर जिल्ह्याचे वरदान ठरलेलले उजनी धरण मागील अनेक दिवसांपासून मायनसमधून प्लसमध्ये येण्याच्या प्रतीक्षेत होते. आज (शुक्रवार) सकाळी सव्वानऊ वाजण्याच्या सुमारास उजनी धरण प्लसमध्ये आले असून, उजनी धरणात सध्या एकूण ६३.७३ टीएमसी पाणीसाठा म्हणजे ०.१३ टक्के पाणी पातळी झाली आहे. उजनी धरण प्लसमध्ये आल्यामुळे शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांमध्ये आनंदाचे व समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. लवकरात लवकर उजनी १०० टक्के भरावे, हीच अपेक्षा व्यक्त होत आहे.

मायनसमधून प्लसमध्ये धरण आले आहे. त्यामुळे उजनीवर अवलंबून असणाऱ्या सर्वांनाच काही अंशी दिलासा मिळाला आहे. मात्र उजनी धरण १०० टक्के क्षमतेने भरण्यासाठी अद्यापही ५४ टीएमसी पाण्याची आवश्यकता आहे. शुक्रवारी उजनी धरणातील एकूण पाणीसाठा ६३.७३ टीमसी झाल्याने उजनी धरण प्लसमध्ये आले आहे.
२१ जानेवारी २०२४ रोजी उजनी धरण हे मायनसमध्ये गेल होतं. उजनीनं ४४ वर्षाचा इतिहास मोडीत काढला होता. यावर्षी उजनी हे ६० टक्के मायनसमध्ये गेलं होतं. त्यामुळे सर्वांचेच धाबे दणाणले होते. यंदाच्या पावसाळ्यात ते पुन्हा कधी प्लसमध्ये येणार, याचे वेध सर्वांना लागले होते. अखेर शुक्रवारी सकाळी सव्वानऊ वाजण्याच्या सुमारास उजनी धरण मायनसमधून प्लसमध्ये आलं आहे.

पुणे शहरांसह जिल्ह्याच्या पश्चिम घाटमाथ्यावर मोठा पाऊस झाल्याने उजनी धरणात दीड लाखाचा विसर्ग भीमा नदीत सोडण्यात आला होता. त्यामूळे पाणीसाठ्यात मागील दोन दिवसांपासून वाढ होत आहे. त्यामुळे उजनीच्या पाण्यात झपाट्याने वाढ होत आहे. उजनी धरणाची एकूण पाणी साठवण क्षमता १२३ टीएमसी आहे. ज्यावेळी उजनी धरण १०० टक्के भरते, त्यावेळी ११७ टीएमसी पाणीसाठा होतो. यापैकी ६३ टीएमसी हा मृत साठा म्हणून गणला जातो, तर ५४ टीएमसी पाणीसाठा हा जिवंत पाणीसाठा म्हणून गणला जातो. उजनी १०० टक्के होण्यासाठी आणखी ५४ टीएमसी पाण्याची आवश्यकता आहे. सध्या उजनी धरणात दौंडहुन उजनी जलाशयात १लाख ४८ हजार ७३७ क्युसेक इतक्या दाबाने पाणी येत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!