ध्यास विश्वसार्ह बातमीचा

ताई तू काळजी करू नकोस ; मुख्यमंत्र्यांचा व्हिडीओ व्हायरल

मुंबई : वृत्तसंस्था

राज्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी गेल्या काही दिवसापूर्वी लाडक्या बहिणीसाठी मोठी योजनांची घोषणा केली होती. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील महिलांसाठी एक खास व्हिडिओ जारी केला आहे. ताई तू काळजी करू नकोस म्हणत त्यांनी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत वाढवली आहे. योजनेसाठी राज्यभरातील महिलांची वाढती गर्दी आणि प्रतिसाद पाहून सरकारने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता महिलांना 31 ऑगस्ट 2024 पर्यंत या योजनेसाठी अर्ज करता येणार आहे. मुख्यमंत्री कार्यालयाकडून या संदर्भात एक व्हिडिओ जारी करण्यात आला आहे.

या व्हिडिओमध्ये मुख्यमंत्री शिंदे यांनी राज्यभरातील लाडक्या बहिणींना साद घातली आहे. शिंदे म्हणाले, ”ताई, तुमच्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आम्ही सुरू केली. त्याला तुम्हा सर्वांचा भरभरुन प्रतिसाद मिळतोय, त्याबद्दल मनापासून धन्यवाद, ताई कुणाला किती विरोधात बोलू दे, तू काळजी करू नकोस, राज्यातील महायुती सरकार तुझ्या पाठीशी भक्कमपणे उभं आहे. तुझ्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, आरोग्यासाठी, पोषणासाठी तुला दरमहा दीड हजार रुपये म्हणजेच, वर्षाला 18 हजार रुपये देण्याचा निर्णय तुझ्या या भावाने घेतला आहे”, असे शिंदे म्हणाले.

तसेच ”या योजनेला मिळणारा वाढता प्रतिसाद पाहून आणि नावनोंदणीसाठी झालेली गर्दी पाहून आम्ही अर्ज भरण्याची मुदत वाढवून 31 ऑगस्ट केली आहे. ज्या भगिनी 31 ला नोंदणी करतील, त्यांनादेखील जुलै महिन्यापासून लाभ देण्यात येणार आहे”, असे मुख्यमंत्र्यांनी या व्हिडीओत स्पष्ट केले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी आता महिलांना 31 ऑगस्टपर्यंत अर्ज भरता येणार आहे. दरम्यान, या योजनेसाठी अर्ज करण्यात आलेल्या लाभार्थी महिलांना 01 जुलै, 2024 पासून दर माह रु.1500/- आर्थिक लाभ देण्यात येणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!