मुंबई : वृत्तसंस्था
आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यातील नेत्यांनी आतापासून राज्याचे राजकारण तापविले आहे. नुकतेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात उद्धव ठाकरे यांच्या विधानावर भाजप नेत्यांनी बुधवारी तिखट शब्दांत प्रत्युत्तर दिले आहे. नाक्यावरच्या भांडणासारखी पोरकट विधाने करत ठाकरेंनी महाराष्ट्राची राजकीय संस्कृती गुंडाळून ठेवली आहे.
अनेकांना फडणवीसद्वेषाची कावीळ झाली आहे, फडणवीसांचे राजकारण संपवायला ठाकरेंना शंभर जन्म घ्यावे लागतील, अशा शब्दांत विविध भाजप नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा समाचार घेतला. ठाकरे गटाच्या शाखाप्रमुखांच्या मेळाव्यात बुधवारी उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर खालच्या भाषेत टीका केली. ‘आता एक तर तुम्ही राहाल किंवा मी राहीन,’ असे आव्हान त्यांनी दिले. त्यांच्या या भाषेवर आक्षेप घेत भाजपच्या नेत्यांनी प्रत्युत्तर दिले.
दरेकर ठाकरेंची भाषा ही फडणवीसांना दिलेली व्यक्तिगत धमकी असून, त्याला भाजप भीक घालत नाही, अशा शब्दांत भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी ठाकरेंना लक्ष्य केले. फडणवीस त्यांच्या कामातून लोकांना जिंकताहेत विधानसभेला महाराष्ट्रात मोदींची आवश्यकता नाही. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस पुरेसे आहेत, असेही दरेकरांनी ठाकरेंना सुनावले. उपाध्ये भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये म्हणाले, आज महाराष्ट्रातील जनतेला उद्धव ठाकरेंची लाज वाटू लागली आहे. महाराष्ट्रात समृद्ध परंपरा आहे. बाळासाहेब ठाकरे, शरद पवार, गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन, अशी मोठी परंपरा आहे. हे एकमेकांचे विरोधक होते, मतभेद होते; मात्र कोणीही कोणाला संपवण्याची भाषा केली नाही. ही भाषा एका माजी मुख्यमंत्र्याला शोभणारी नाही.
वाघ भाजप नेत्या चित्रा वाघ म्हणाल्या, देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची कावीळ झालेले अनेक कावीळग्रस्त सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात वावरत आहेत. त्यातील एक उद्धटपंत म्हणजे उद्धव ठाकरे आहेत. उठसूट फडणवीसांवर गरळ ओकण्यासाठी एकाला तुम्ही कायमचे पाळलेले आहेच, असा टोला त्यांनी लगावला.