नाशिक : वृत्तसंस्था
मी वेश बदलून, नाव बदलून दिल्लीला गेल्याची चर्चा म्हणजे विरोधकांनी उठवलेल्या वावड्या आहेत. माझी बदनामी करण्याचे हे षडयंत्र आहे. राज्याच्या मंत्रिमंडळात अनेक खात्यांचा मंत्री राहिलो असल्यामुळे जबाबदारी मला पण कळते. विरोधकांकडून बिनबुडाचे आरोप केले जात आहेत. हे आरोप सिद्ध झाले, तर मी राजकारणातून निवृत्त होईन, असा पलटवार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला.
पिंपळगाव बसवंत येथे पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, अर्थ विभागाकडे पैसे नसल्याचे सांगत सलग दोन दिवस लाडकी बहीण योजनेबाबत बदनामी करण्यात आली. मात्र त्यात तथ्य नाही. या योजनेसाठी ३५ हजार कोटींची तरतूद केली असून, सभागृहाने त्यास मान्यता दिली आहे. ऑगस्ट महिन्यात दोन महिन्यांचे पैसे लाडक्या बहिणींना वितरित केले जातील, असे पवार यांनी स्पष्ट केले.
पुण्याच्या पुराबाबत राज ठाकरे यांनी माझ्याबाबत काही वक्तव्य केले. प्रत्येक पक्षाची आस्था असणारा काही वर्ग असतो. प्रत्येकाने बोलताना तारतम्य ठेवावे. आपला सुसंस्कृत महाराष्ट्र आहे. कायदा हातात घेण्याचा अधिकार कुणालाही नाही. विकासावर बोला, अन्यायाला वाचा फोडा, कारण नसताना भडक वक्तव्ये करायची आणि लक्ष वेधून घ्यायचे, असा प्रकार सुरू आहे. यापुढे कोणीही कायदा हातात घेतल्यास कायद्याने कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही पवार यांनी दिला.