मुंबई : वृत्तसंस्था
राज्यात आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वीच मराठा समाजाचा आरक्षणाचा विषय मोठा रंगत असतांना आता भाजपचे नेते नारायण राणे यांनी जरांगे पाटलांवर टीकास्त्र सोडले होते. आता यावर जरांगे पाटलांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे.
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील म्हणाले कि, नारायण राणेंबद्दल मी काही बोलत नाही. त्यांनी उगाच मला धमक्या देऊ नये असा इशारा त्यांनी दिला आहे. तसेच त्यांनी भाजप आमदार राम कदम यांनाही सुनावले आहे. त्यांनी या वादात उडी घेऊ नये असे ते म्हणाले आहेत. आमदार राम कदम यांचा दहीहंडी आमदार म्हणून उल्लेख करत मनोज जरांगे यांनी निशाणा साधला आहे.
नारायण राणे यांच्याबाबत बोलतांना मनोज जरांगे म्हणाले, ”मी नारायण राणेंना मानतो. निलेश राणेंनी त्यांना समजावून सांगावं, मी नारायण राणेंना काही बोलत नाही, शांत आहे. बोलायला लागलो तर मी थांबणार नाही. नारायण राणेंनी मला उगाच धमक्या देऊ नयेत. नारायण राणेंनी काय किंवा इतर कुणी काय मला फुकट धमक्या देऊ नयेत. मी कुणालाही भीत नाही”, असे जरांगे म्हणाले. पुढे त्यांनी वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनाही इशारा दिला आहे. ”मी ओबीसीतूनच आरक्षण घेणार आहे. माझा मराठा समाजही आरक्षण ओबीसीतूनच घेणार आहे. आम्ही देवेंद्र फडणवीस यांचा आदर करतो. गोरगरीबांची सत्ता आणावी असं मला वाटतं. गोरगरीबांचं कल्याण होईल असंच पाऊल मी उचलतो आहे. गरीबांचं कल्याण घडायचं असेल तर सत्तेवरही तेच लोक बसले पाहिजेत”, असे जरांगे म्हणाले.