मुंबई : वृत्तसंस्था
राज्यात गेल्या दोन दिवसापासून जोरदार पाऊस सुरु असून आता पुणे, नाशिकमध्ये रविवारी जोरदार पाऊस झाला. नाशिकला गाेदावरीला पूर आला असून, पुण्यात मुसळधार पावसामुळे खडकवासलासह ४ धरणांतून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू केला आहे. नाशिकसह जायकवाडीच्या वरील भागात जोरदार पाऊस सुरू असल्याने गोदावरी नदीच्या पात्रात ३१ हजार २८० क्युसेक आवक होत आहे. रविवारी संध्याकाळी ६ वाजता धरणात १५ हजार १८५ क्युसेकने आवक सुरू होती. त्यामुळे रविवारी साठ्यात १.२०% वाढ झाली, अशी माहिती कार्यकारी अभियंता प्रशांत जाधवसह गणेश खराडकर यांनी दिली. रविवारी पाणीसाठा ११.२० टक्क्यांवर होता. सध्याचा साठा बघता पुढील आठ महिने पिण्यासाठी व उद्योगासाठी लागणाऱ्या पाण्याची चिंता मिटली आहे, असे अभियंता विजय काकडे यांनी सांगितले. पुण्यातील खडकवासलातून मुठा नदीपात्रात होणारा विसर्ग वाढवून ४५ हजार क्युसेक केला आहे.
पावसाच्या प्रमाणानुसार व येण्यानुसार विसर्ग कमी-जास्त करण्याची शक्यता आहे, तर वीर धरणाच्या सांडव्याद्वारे सुरू असलेला ५३ हजार ८४७ क्युसेक एवढा विसर्ग वाढवून तो ६१ हजार ९२३ क्युसेक करण्यात आला आहे. पावसाचे प्रमाण व तीव्रता लक्षात घेता विसर्गामध्ये बदल करण्यात येईल,असे आवाहन करण्यात आले आहे.
सोलापूर जिल्ह्यातील उजनी धरणाचे ४१ पैकी १६ दरवाजे ४९ सेंटीमीटर इतके उघडून रविवारी सायंकाळी ५ वाजता भीमा नदीपात्रात २० हजार क्युसेक विसर्ग सोडला आहे. पाणी साठवण क्षमतेत सर्वाधिक १२३ टीएमसी असलेल्या या धरणात ११२ टीएमसी इतका साठा झाला आहे.
रेड अलर्ट (जोरदार ते अति जोरदार पाऊस) : कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे, पालघर, विदर्भातील सर्व जिल्हे
ऑरेंज अलर्ट ( जोरदार पाऊस) : मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, नगर आणि नाशिक जिल्ह्यातील घाटमाथ्याचा परिसर
यलो अलर्ट (वादळवारे, मध्यम पाऊस) : उर्वरित मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यातील सर्व जिल्हे
पावसात जीर्ण घरांपासून दूर राहा. प्रशासनाने वेळीच अशा बांधकामांवर कारवाई केल्यास असे अपघात रोखता येतील.
गुजरात ते केरळ किनारपट्टीवर हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय अाहे. तसेच राजस्थान ते गुजरात सीमेवरही हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने राज्यात पावसाला अनुकूल वातावरण तयार झाले आहे.