मुंबई : वृत्तसंस्था
राज्यात आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी आतापासून सर्वच पक्ष राज्यातील निवडणुकीसाठी तयारीला लागले असून आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. तर, मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनीही महाराष्ट्र दौरा सुरू केला आहे. त्यातच, आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा अचानक दिल्ली दौरा ठरल असून आज मध्यरात्रीच ते राजधानी दिल्लीत पोहोचणार आहे. तर, दुसरीकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही मराठवाड्यातील भाजप आमदारांची बैठक बोलावली आहे. त्यामुळे, राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत असल्याचं दिसून येत आहे.
राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार रखडला असून विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनापूर्वीच मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याची चर्चा होती. मात्र, आता विधानसभा निवडणुकांना अवघे 3 महिने राहिले असतानाही मंत्रिमंडळ विस्तार लांबणीवर पडल्याने मंत्रीपदासाठी इच्छुक असलेल्या आमदारांची गोची झाली आहे.
त्यातच, विधानसभा निवडणुकांना कसं सामोरे जायचं याची रणनीती सर्वच राजकीय पक्षांकडून आखली जात आहे. दुसरीकडे मराठा आरक्षणाचा मुद्दा कळीचा बनला असून उपोषणकर्ते मनोज जरांगे यांनी सत्ताधारी पक्षांविरुद्ध रणशिंग फुंकले आहे. त्यामुळे, फेक नेरेटीव्ह आणि मराठा आरक्षणाचा मुद्दा सोडवण्यासाठी महायुती प्रयत्नशील आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दिल्ली दौरा अचानक कोणत्या कारणासाठी नियोजित केला आहे, यावरही तर्कवितर्क लावले जात आहेत. राज्यातील रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार हे कारण तर नाही ना, अशीची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. त्यासाठी, मुख्यमंत्री शिंदे रात्री आज रात्री दिल्लीत जाणार असून हा दौरा अचानक ठरला असल्याची माहिती आहे. महत्त्वाच्या बैठकीसाठी दिल्ली दौरा नियोजित करण्यात आल्याचेही सुत्रांनी सांगितले.