सोलापूर : वृत्तसंस्था
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राज्याच्या दौऱ्यावर निघालेले मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे सध्या सोलापूरमध्ये असून त्यांनी आज माध्यमांशी संवाद साधला आहे. महाराष्ट्रात सर्व गोष्टी मुबलक प्रमाणात आहेत, त्यामुळे महाराष्ट्रामध्ये आरक्षणाची गरजच नाही, असे मोठे विधान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी केले आहे.
यावेळी राज ठाकरे म्हणाले कि,मुंबई, पुणे, ठाणे, नागपूर या भागात उड्डाणपुले व इतर गोष्टी होत आहेत. त्या महाराष्ट्रातील मूळच्या लोकसंख्येसाठी होत नाहीत. बाहेरून आलेल्या लोकसंख्येसाठी या सोयी सुविधा होत आहेत. बाहेरून आलेल्या लोकांसाठी राज्याचा सर्वाधिक पैसा खर्च होत आहे. ठाणे हा देशातील हा एकमेव जिल्हा जिथे 7-8 महापालिका आहेत. एकाच जिल्ह्यात सात ते आठ महापालिका असतील तर मग इथली लोकसंख्या काय ठाण्यातील लोकांनी वाढवली आहे का? म्हणजे बाहेरून येणाऱ्या लोकांचा लोंढा एवढा मोठा आहे की, त्यांची व्यवस्था लावण्यातच सरकारचा पैसा मोठ्या प्रमाणात खर्च होतो. आपल्याकडे शेतकरी आत्महत्या करतात, त्याच्याकडे लक्ष द्यायला वेळ नाही, असेही राज ठाकरे यांनी नमूद केले. ते म्हणाले, आपल्याकडे नोकरीच्या संधी निर्माण होत आहेत. पण आपल्याकडच्या तरुणांना माहितीच नसतं की नोकऱ्या कुठे निर्माण झाल्या आहेत. महाराष्ट्रातील नोकऱ्यांच्या यूपी आणि बिहारमधील वर्तमानपत्रात जाहिराती येतात आणि महाराष्ट्रात येत नाहीत. राज्यातील उद्योगधंद्यात नोकऱ्या आहेत, हे बाहेरच्या लोकांना कळतं आणि आपल्या पोरांना कळत नाही. त्यांनाही नोकरी करायची असते, त्यांचं आयुष्य उभं करायचं असतं.
अशा परिस्थितीत आपल्य राज्य चालवंल जातंय. गेली अनेक वर्षे असंच चालवलं जातंय. मी त्यावर गेली काही वर्षे सातत्याने बोलत आहे. बेरोजगारांची यादी यायची, तीही आता बंद झाली आहे, त्यामुळे महाराष्ट्रात इतक्या गोष्टी उपलब्ध असताना आपल्याला आरक्षणाची गरजच नाही. पहिल्यांदा आपल्या महाराष्ट्रातील लोकांना संधी द्या. त्यातूनही उरल्या तर बाहेरच्यांना बोलवा. मी काय देश तोडायचा विचार करत नाही, असेही राज ठाकरे यांनी स्पष्ट केले.