सोलापूर : वृत्तसंस्था
मोहोळ तालुक्यातील अनगर येथे मंजूर झालेल्या अप्पर तहसील कार्यालयाच्या समर्थनार्थ धरणे आंदोलन करण्यासंदर्भात विचार विनिमय करण्यासाठी मोहोळ तालुक्यातील कार्यकर्ते, नेते, पदाधिकारी यांची महत्त्वाची बैठक मोहोळ येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत आयोजित केली होती. त्या बैठकीला विरोध म्हणून मोहोळ शहरातील व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे कडकडीत बंद पाळत अनगरच्या अप्पर तहसील कार्यालयाला विरोध दर्शविला.
मागील आठ दिवसांपासून अनगर येथील अप्पर तहसील कार्यालयाचा विषय मोहोळ तालुक्यात चांगलाच तापला असून यापूर्वी मोहोळ शहर तसेच पेनुर, नरखेड व शेटफळ अशी तालुक्यातील प्रमुख गावे बंद पाळून त्या अप्पर तहसील कार्यालयाच्या विरोधात भूमिका दर्शविण्यात आली होती. रविवारपासून मोहोळ तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन ही सुरू आहे. आज अप्पर तहसील कार्यालयाच्या समर्थनार्थ बैठक असल्याचे समजतात व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे आठवड्याचा पहिला दिवस असलेल्या सोमवारी मोहोळ शहर कडकडीत बंद केले. व धरणे आंदोलनाला पाठिंबा दिला. यावेळी मोहोळ शहरातील व्यापारी, नागरिक व मोहोळ बचाव संघर्ष समितीचे सदस्य उपस्थित होते.
अनगरच्या अप्पर तहसील कार्यालयाच्या निषेधार्थ मोहोळ शहरात सोमवारी कडकडीत बंद पाळण्यात आल्यानंतर चेंबर ऑफ कॉमर्सच्या वतीने ही मोहोळ तालुका बचाव संघर्ष समितीच्या वतीने सुरू असलेल्या धरणे आंदोलनाला पाठिंबा देत जोपर्यंत तेथील अप्पर तहसील कार्यालय रद्द होत नाही. तोपर्यंत सर्व व्यापारी बेमुदत बंद पाळून पाठिंबा देतील, अशी भूमिका व्यापाऱ्यांनी जाहीर केली.
अन्याय करून अप्पर तहसिल कार्यालय अनगर येथे नेले आहे. सगळ्या व्यापाऱ्यांचे आर्थिक नुकसान होणार आहे. त्यामुळे मोहोळच्या सगळ्या व्यापाऱ्यांनी आज उत्स्फूर्तपणे बंद ठेवला आहे. जोपर्यंत तो निर्णय रद्द होत नाही तोपर्यंत बेमुदत बंदला आमचा पाठिंबा आहे. आमच्यावर कोणाचाही कसलाही दबाव नाही.