बीड : वृत्तसंस्था
राज्यातील अनेक महामार्गावर अपघाताच्या मालिका सुरु असतांना नुकतेच बीड पोलिसांनी स्वतःचा जीव संकटात टाकून एका पेटत्या ट्रकमध्ये अडकलेल्या तब्बल 150 शेळ्या- मेंढ्यांना वाचवल्याची रविवारी मध्यरात्री बीड जिल्ह्यातील पाडळशिंगी टोलनाक्याजवळ घडली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, रविवारी मध्यरात्री RJ 19 GJ 4797 या क्रमांकाचा ट्रक राजस्थानहून हैदराबादकडे जात होता. या ट्रकमधून 170 शेळ्या-मेंढ्यांची वाहतूक केली जात होती. या ट्रकला पाडळसिंगी टोलनाक्यालगत अचानक आग लागली. त्यावेळी टोलनाक्यावरील महामार्ग पोलिस मदत केंद्र, गेवराई येथील रात्रपाळीवर असलेल्या पोलिसांनी तत्काळ या ट्रकच्या दिशेने धाव घेऊन ट्रकमधील 150 शेळ्या-मेंढ्यांची सुटका केली. आगीच्या ज्वाळांत अडकलेल्या ट्रक चालक व वाहकालाही त्यांनी बाहेर काढले. त्यांच्या या धाडसाचे मोठे कौतुक केले जात आहे. याकामी पोलिस हवालदार विकास काकडे, अन्सार मोमीन, अमर घुगे, पठाण, जमशेटे, अनंत गिरी, कृष्णा जाधव यांनी महत्त्वाची कामगिरी बजावली.