हिंगोली : वृत्तसंस्था
आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे राज्याच्या दौऱ्यावर निघाले असून ते दि.८ रोजी हिंगोली शहरात दाखल झाल्यानंतर त्यांनी मनसे पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी हिंगोली विधानसभा मतदारसंघातील उमेदवाराची घोषणा केली. त्यामुळे हिंगोलीत मनसे विरुद्ध भाजप अशी लढत पाहायला मिळणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हिंगोली विधानसभेतून मनसेचे जिल्हाप्रमुख बंडू कुटे यांची राज ठाकरे यांच्याकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. आज झालेल्या आढावा बैठकीनंतर स्वतः राज ठाकरे यांनी ही उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे, आतापर्यंत मनसेच्या वतीने 4 जणांची उमेदवारी निश्चित केली आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर असून सोलापूर, धाराशिव, लातूर दौरा करुन ते आज हिंगोलीत पोहोचले आहेत. हिंगोलीत त्यांचं मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आलं, चक्क जेसीबीने फुलांची उधळण करत राज ठाकरेंचा हिंगोलीतील मनसैनिकांनी सन्मान केला. हिंगोली विधानसभा मतदारसंघात भाजपचे तानाजी सखारामजी मुटकुळे हे विद्यमान आमदार आहेत. आता, या मतदारसंघातून मनसेनं उमेदवारी जाहीर करत हिंगोली मनसेच्या जिल्हाध्यक्षांना तिकीट दिले आहे. राज ठाकरेंनी चक्क खांद्यावर हात ठेऊन, आता तुम्ही यांच्याकडे लक्ष द्या, असे आवाहन हिंगोलीकरांना व मनसैनिकांना केले.