लातूर ; वृत्तसंस्था
गेल्या वर्षी सरकारने बांधकाम कामगारांसाठी मोठी योजना काढली असून त्यासाठी राज्यातील अनेक ठिकाणी फॉर्म भरण्यासाठी मोठी गर्दी देखील होत आहे तर नुकतेच बांधकाम कामगार योजनेच्या फॉर्मवर स्वाक्षरी करण्याच्या वादातून एका महिला सरपंचाला ग्रामपंचायत कार्यालयातच कुलुपबंद करण्यात आल्याची घटना लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यात घडली आहे. या घटनेची पंचक्रोशीत चर्चा रंगली आहे.
चाकूर तालुक्यातील शिवणखेड येथे ही घटना घडली आहे. सरपंच बायनाबाई साळुंके या येथील सरपंच आहेत. त्या नेहमीसारखे ग्रामपंचायत कार्यालयात बसल्या होत्या. त्या आपले दैनंदिन कामकाज करत असताना सुरज साके नामक व्यक्तीने बांधकाम कामगार योजनेच्या अर्जावर स्वाक्षरी करण्याच्या मुद्यावरून त्यांच्याशी वाद घातला. त्यानंतर त्यांना कार्यालयातच कोंडून टाकले. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन त्यांची सुटका केली.
बायनाबाई साळुंके यांनी या घटनेची माहिती देताना सांगितले की, सुरज साके यांनी ग्रामपंचायत कार्यालयात येऊन माझ्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. मी यासंबंधी त्यांना विचारणा केली असता त्यांनी मला काही अर्जांवर तुमची स्वाक्षरी हवी असल्याचे सांगितले. मी त्यांना कोणते अर्ज असा प्रश्न केला. त्यावर त्यांनी हे अर्ज बांधकाम कामगार योजनेचे असल्याचे सांगितले.
त्यानंतर मी त्यांना तुम्ही तुमच्यापुरते बोला, गावातील इतर लोकांच्या अर्जावर मी योग्य तो निर्णय घेईल असे सांगितले. त्यानंतर त्यांनी घरी जाऊन कुलूप आणले व मला ग्राम पंचायत कार्यालयात कोंडून टाकले. मी जवळपास 45 मिनिटे कार्यालयात बंदिस्त होते. त्यानंतर पोलिसांनी येऊन माझी सुटका केली, असे बायनाबाई साळुंके यांनी सांगितले. ही घटना घडली तेव्हा गावातील इतर नागरिकही घटनास्थळी उपस्थित होते. पण त्यांनी कोणताही हस्तक्षेप केला नसल्याची माहिती आहे. या प्रकरणी सुरज साके यांच्याविरोधात चाकूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हा प्रकार गावातील काही लोकांनी पहिल्याचे सरपंच साळुंके यांनी फिर्यादीत नमूद केले आहे. सदर व्यक्तीपासून माझ्या कुटुंबीयांच्या जीवितास धोका असल्याचेही त्यांनी तक्रारीत नमूद केले आहे. त्यांच्या फिर्यादीवरून सुरज बळीराम साके यांच्याविरोधात गुरुवारी रात्री ॲट्रॉसिटी अंतर्गत चाकूर पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी बी चंद्रकांत रेड्डी करीत आहेत.