छत्रपती संभाजीनगर : वृत्तसंस्था
राज्यातील प्रहार संघटना मोठ्या प्रमाणात आक्रमक झाली असून आमदार हे विधानसभा निवडणुकीपूर्वी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. 9 ऑगस्ट रोजी छत्रपती संभाजीनगरमध्ये भव्य मोर्चा काढल्यानंतर दुसऱ्याच दिवशी ते थेट शरद पवार यांच्या भेटीला पोहोचले आहेत. पुण्यातील शरद पवार यांच्या मोदीबागेत या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली आहे. यावेळी प्रसार माध्यमांनी त्यांना शरद पवारांसोबत जाणार का असा प्रश्न केला असता शेतमजूर, दिव्यांगांसाठी आम्ही काहीही करू असे सूचक विधान त्यांनी केले आहे. दरम्यान, सकाळी सकाळी बच्चू कडू अचानक शरद पवार यांच्या भेटीला पोहोचल्या राज्याच्या राजकारणात आता तर्क वितर्क लावले जात आहेत.
या भेटीपूर्वी बच्चू कडू यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला आहे. ते म्हणाले, शरद पवार यांच्यासोबतची ही भेट पूर्वनियोजित होती. जे मुद्दे समोर ठेवत छत्रपती संभाजीनगरमध्ये मोर्चा काढला त्याच मुद्द्यांवर आज शरद पवार यांच्याशी चर्चा करणार आहे. जाती- धर्मांवर राजकारण होते, तसेच शेतकरी, शेतमजुरांच्या मुद्यावरही राजकारण झाले पाहिजे. हेच मुद्दे आज शरद पवार यांच्यासमोर मांडणार आहे.
या मुद्द्यांवर इतर पक्ष सहमत होतील का यासाठी प्रयत्न सुरू आहे”, असे कडू म्हणाले.
पुढे तुम्ही शरद पवार यांच्यासोबत दिसणार का असा सवाल त्यांना करण्यात आला. त्यावर ते म्हणाले, अजून तरी तसे काही चित्र नाही. आम्ही एक सप्टेंबरपर्यंत सरकारला वेळ दिलेली आहे. तोपर्यंत कोणताही निर्णय घेणार नाही असे बच्चू कडू यांनी स्पष्ट केले आहे. तसेच महायुतीमध्ये तुम्ही नाराज आहात का? या प्रश्नावर आमची नाराजी महत्त्वाची नाही तर शेतकरी, शेतमजुरांचे प्रश्न महत्त्वाचे आहेत. बच्चू कडू स्वतःसाठी कधीच नाराज नसतो”, असे त्यांनी स्पष्ट केले.