ध्यास विश्वसार्ह बातमीचा

भाजपचे उमेदवार मुळासकट उखडून फेकल्याशिवाय राहणार नाही ; जरांगे पाटलांचा इशारा

नाशिक : वृत्तसंस्था

मराठा आरक्षण शांतता रॅलीचा समारोप बुधवारी १३ ऑगस्ट नाशिकमध्ये झाला त्या वेळी ते बोलत होते. आपल्या ५६ मिनिटांच्या भाषणात त्यांनी फडणवीस आणि भुजबळांवरच घणाघाती प्रहार केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच शरद पवार, उद्धव ठाकरे व राज ठाकरे यांचा उल्लेखही केला नाही.

मराठा समाजाला आरक्षण मिळू न देण्याची चूक फडणवीसांनी करू नये, अन्यथा विधानसभेला तुमच्यासह भाजपचे उमेदवार मुळासकट उखडून फेकल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा मराठा आरक्षण आंदोलन नेते मनाेज जरांगे पाटील यांनी दिला. पक्ष, नेत्यापेक्षा समाजाला बाप माना. निर्णायक भूमिका घेऊन येत्या विधानसभा निवडणुकीत पाडायचे की उभे करायचे याचा फैसला २९ तारखेला घेऊ. त्यासाठी नाशिकसह राज्याच्या गावागावांतील मराठ्यांनी आंतरवालीत येण्याचे आवाहनही त्यांनी केले.

छगन भुजबळ ही नाशिकला लागलेली साडेसाती असून येत्या निवडणुकीत हा डाग पुसून येवल्याचे नाव पवित्र करणार आहे. मला म्हणतो, ८ जागा तरी निवडून आणून दाखव. तुझाच कार्यक्रम करतो बघ. तुझ्याच जिल्ह्यातील तुझे उमेदवार निवडून येतात की बघ आधी. भुजबळने शिवसेना, राष्ट्रवादी फोडली, आता फडणवीसांच्या माध्यमातून तो भाजप फाेडेल. ज्याने मराठा आरक्षणाला त्रास दिला त्याला आडवे केलेच समजा. भुजबळ एकदाच नादी लागला तर त्याला नाशिकदेखील सोडू दिले जाणार नाही. त्याचा कार्यक्रम लावणार म्हणजे लावणार. राजकारणात फडणवीस यांनी अनेकांना मातीत घातले, अनेकांना पाणी पाजले पण त्यांना मी वस्ताद भेटलो. फडणवीस तुम्ही राजकारण करू नका, आमचे नेमके काय चुकले? ते तरी सांगा. मात्र, केवळ आरक्षण द्यायचे नाही म्हणून षडयंत्र रचू नका. मी कुणाला मॅनेज हाेत नाही आणि फुटत नाही. आम्हाला राजकारणात यायचे नाही पण तुम्ही आम्हाला तसे करण्यास भाग पाडू नका, असा इशारा जरांगे यांनी दिला.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!