ध्यास विश्वसार्ह बातमीचा

मोठी बातमी : कॉंग्रेसच्या दोन आमदारांनी घेतली मुख्यमंत्री शिंदेंची भेट !

मुंबई : वृत्तसंस्था

आगामी विधानसभा निवडणुकीच्यापूर्वी राज्यातील वातावरण आरोप प्रत्यारोपामुळे तापले असून दुसरीकडे कॉंग्रेसचे २ आमदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या वाटेवर असल्याची खात्रीलायक वृत्त आहे. या दोन आमदारांनी मंगळवारी रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. यापैकी एक मुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री तथा भाजप नेते अशोक चव्हाण यांचा विश्वासू आहे हे विशेष.

काँग्रेस आमदार हिरामण खोसकर व जितेश अंतापूरकर यांनी मंगलवारी रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची त्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी भेट घेतली. त्यामुळे हे दोन आमदार लवकरच काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन शिवसेनेची कास धरतील असा अंदाज आहे. विधानपरिषदेच्या निवडणुकीत या दोन्ही आमदारांनी सत्ताधारी महायुतीच्या उमेदवाराला मतदान केल्याचा आरोप आहे. त्यामुळे काँग्रेसने त्यांना आगामी विधानसभा निवडणुकीत तिकीट न देण्याची भूमिका घेतली आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यामुळे ते लवकरच शिवसेनेत जातील अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

उल्लेखनीय बाब म्हणजे जितेश अंतापूरकर हे नांदेड जिल्ह्यातील देगलूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. ते माजी मुख्यमंत्री तथा भाजप नेते अशोक चव्हाण यांचे निकटवर्तीय मानले जातात. त्यामुळे ते चव्हाणांसोबत भाजपमध्ये जातील असा अंदाज होता. पण मध्येच त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यामुळे ते शिवसेनेत जाणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!