ध्यास विश्वसार्ह बातमीचा

चारचाकीतून उतरली अन अटल सेतूवरून मारली उडी ; सुदैवाने वाचली !

मुंबई : वृत्तसंस्था

राज्यातील अनेक शहरातून धक्कादायक बातमी समोर येत असतांना नुकतेच मुंबईमध्ये शुक्रवारी एका 56 वर्षीय महिलेने अटल सेतूवरुन उडी घेत आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. मात्र कॅब चालकाची सतर्कता आणि वाहतूक पोलिसांच्या प्रयत्नांमुळे महिलेचे प्राण वाचले. ही महिला मुलुंडमधील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. मात्र मी आत्महत्या करत नव्हते तर देवांचे फोटो समुद्रात फेकत होते असे या संबंधित महिलेने पोलिसांना सांगितल्याचे बोलले जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अटल सेतूवरून उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या महिलेला न्हावा शेवा वाहतूक पोलीस कर्मचारी आणि कॅब चालक यांनी वाचवले आहे. संबधित घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. रिमा पटेल असे महिलेचे नाव आहे. त्यांनी मुलुंडमधून एक कॅब बुक केली आणि त्या कॅबमधून सेतूवर आल्या होत्या. त्यांनी चालकाला कॅब थांबवण्यासाठी सांगितली आणि कारमधून उतरून त्या अटल सेतूच्या रेलिंगवर चढल्या. त्याचवेळी न्हावा शेवा वाहतुक पोलिसांची पेट्रोलिंग व्हॅन अटल सेतूच्या रस्त्यावर गस्त घालत होती.

एक महिला अटल सेतूच्या रेलिंगवर उभी असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. शेलार टोल नाक्यावर असणाऱ्या टोल कर्मचाऱ्यांनी देखील या संदर्भात पोलिस पथकाला माहिती दिली. तसेच कॅब ड्रायव्हर संजय द्वारका यादव यांनी महिलेचे केस धरून वाचवण्यासाठी प्रयत्न करत होते. तेवढ्यात पोलिस घटनास्थळी दाखल झाले. वाहतूक पोलीस कर्मचारी ललित शिरसाठ, किरण म्हात्रे, यश सोनवणे, मयूर पाटील या चौघांनी महिलेचे प्राण वाचवले.

दरम्यान, ही महिला नैराश्याने त्रस्त होती आणि जीवन संपवण्याच्या उद्देशाने ती पुलावर आली होती. याच घटनेचा थरारक व्हिडीओ सध्या सर्वत्र व्हायरल होत असून त्याचीच चर्चा सुरू आहे. अटल सेतूवरून उडी मारून जीव देण्याच्या घटना गेल्या काही महिन्यांत मोठ्या प्रमाणात घडल्या आहेत. काही महिन्यांपूर्वीच दादरमधील एका डॉक्टरने तसेच त्यानंतर एका बिझनेसमननेदेखील अटल सेतूवरून उडी मारून आयुष्य संपवले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!