पुणे : वृत्तसंस्था
विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपचे अनेक ठिकाणी मेळावे सुरु असून नुकतेच आज पुण्यात लाडकी बहीण योजनेचा शुभारंभ झाला. या सोहळ्यात फडणवीस यांनी विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले कि, विरोधकांकडून लाडकी बहीण योजनेत अनेक अडचणी निर्माण करण्यात आल्या. फॉर्म रिजेक्ट होण्यासाठी प्रयत्न झाले, पोर्टल बंद पाडण्यासाठी जंक डेटा टाकला असा गंभीर आरोप त्यांनी यावेळी केला आहे.
या कार्यक्रमासाठी पुण्याचेच निवड करण्यामागचे कारण फडणवीसांनी आपल्या भाषणाच्या सुरवातीलाच सांगितले आहे. ते म्हणाले, ”आज खऱ्या अर्थाने सावित्रीच्या लेकींचा कार्यक्रम आहे. आज अत्यंत आनंदाचा दिवस आहे. लाडक्या बहिणीची ही औपचारिक सुरूवात झाली आहे. याची सुरूवात पुण्यातूनच का असे विचारण्यात आले. तर त्या मागचे कारण म्हणजे जेव्हा परकीयांचे आक्रमक झाले तेव्हा जिजाऊंनी याच पुण्यात सोन्याचा नांगर चालवून स्वराज्याची संकल्पना शिवरायांना दिली होती. तसेच महिलांना शिक्षणाचा अधिकार नाकारला गेला तेव्हा सावित्रीबाई फुले आणि महमात्मा ज्योतिबा फुले यांनी याच पुण्यातून शाळा सुरू केली. पुणे ही समाजकारणाची भूमी आहे. म्हणूनच आज या सोहळ्यासाठी पुण्याची निवड केली”, असे फडणवीस म्हणाले.
फडणवीसांनी यावेळी विरोधकांकडून होत असलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे. ”हे सरकार देना बँक आहे लेना बँक नाही. पूर्वी वसुली करणारे सरकार होते आता बहिणींना देणारे सरकार आहे. १ कोटी ३ लाख महिलांच्या खात्यात पैसे पोहोचले आहेत. उर्वरित महिलांच्या खात्यात पैसे आल्याशिवाय राहणार नाही हा आमचा निर्धार आहे. ही खटाखट नव्हे तर फटाफट योजना आहे”, असे फडणवीस म्हणाले.