हत्तीकणबसच्या सेवानिवृत्त मुख्याध्यापकांचा निवृत्तीनंतरही विद्यार्थ्यांशी लळा
शिक्षणासाठी दहा गरीब विद्यार्थ्यांना घेतले दत्तक
अक्कलकोट ; मारुती बावडे
गावाला शाळेचा आधार आणि शाळेला गावाचा अभिमान असतो असं आपण नेहमी म्हणतो. ग्रामीण भागातल्या गरीब आणि होतकरू मुलांना आधार देत त्यांना शिक्षणाचे धडे देण्याचे कार्य शिक्षक करत असतात.काही संवेदनशील मनाचे शिक्षक सामाजिक दायित्वाचे भान ठेवून गरीब आणि होतकरू मुलांच्या पंखांना बळ मिळावे म्हणून तन-मन-धनाने सहकार्य करण्यासाठी पुढे येतात.अशाच प्रकारे जिल्हा परिषद प्राथमिक मराठी केंद्र शाळा हत्तीकणबस येथील सेवानिवृत्त झालेले केंद्रीय मुख्याध्यापक इस्माईल मुर्डी यांनी इतरांसाठी एक नवा आदर्श वस्तू पाठ घालून दिला आहे.
सेवानिवृत्त झालेले असताना देखील आपला बहुमोल वेळ खर्च करत शाळेच्या विकासामध्ये योगदान देत आहेत.स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून इस्माईल मूर्डी यांनी गरीब कुटुंबातील दहा मुलांना दत्तक घेत त्यांच्या शिक्षणाची जबाबदारी उचलली आहे.पहिली ते सातवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना याचा लाभ होणार आहे.त्यांच्या गरजांची पूर्तता यातून केली जाणार आहे. गरीब विद्यार्थ्यांची निवड गुप्त पद्धतीने केली जाणार आहे आणि या गरीब मुलांच्या शिक्षणाचा आर्थिक खर्च भागवण्यासाठी मुर्डी यांनी मुख्याध्यापकांच्या नावे पाच हजार रुपये इतक्या रकमेचा धनादेश देखील सुपूर्द केला. या दातृत्वाच्या भावनेचा समस्त गावकऱ्यांच्या वतीने सन्मान होत आहे.इयत्ता दहावीमध्ये बोर्ड परीक्षेत प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवलेल्या विद्यार्थ्यांना मुर्डी यांनी दरवर्षी प्रत्येकी पाचशे एक रुपयाचे पारितोषिक देण्याचा निर्णय घेतला आहे.केंद्रीय मुख्याध्यापक म्हणून शाळेची जबाबदारी पार पडत असताना गावातील सर्व पालकांना एकत्रित आणून शाळेच्या विकासामध्ये सामावून घेतले. गावातील सर्व सदन पालक, मोठे शेतकरी, शालेय व्यवस्थापन समितीतील सर्व पदाधिकारी या सर्वांना विश्वासात घेत शाळेच्या भौतिक विकासात भर घातली. लोकवर्गणीतून शाळेसाठी दोन संगणक संच उपलब्ध करून घेतले.आज त्यांच्या प्रयत्नामुळे ग्रामीण भागातील गरिबांची मुले संगणकाची धडे घेत आहेत.लोकसहभागातून तब्बल अडीच लाख रुपये जमा करून शाळेतील मुला मुलींसाठी स्वतंत्र शौचालय बांधता यावे यासाठी दोन गुंठे जागा खरेदी केली. आज शाळेत मुला मुलींसाठी स्वतंत्र शौचालयाची दोन युनिट उपलब्ध झालेले आहेत. या सर्व कार्यामध्ये गावातील सरपंच श्रीशैल माळी,शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष देवेंद्र बिराजदार, उपाध्यक्ष पंचप्पा घोडके, सर्व शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य, माजी तंटामुक्त अध्यक्ष बसवराज माणिक बिराजदार, प्रगतशील बागायतदार शेतकरी सिद्रामप्पा दोड्याळे आणि गावातील असंख्य पालक, शिक्षण प्रेमी, शिक्षक स्टाफ यांचे सहकार्य लाभले. एखाद्या संकल्प पूर्तीसाठी सर्वजण एकत्र आल्यानंतर काय होऊ शकते याचे उत्तम उदाहरण म्हणून या शाळेकडे पाहिले जात आहे. समाजात दरवर्षी हजारो शिक्षक, शेकडो मुख्याध्यापक निवृत्त होत असतात. काही शिक्षक,काही मुख्याध्यापक आपण समाजासाठी काहीतरी देणे लागतो या भूमिकेतून ऋण व्यक्त करण्याच्या भूमिकेतून काही ना काही करत असतात पण अशी मंडळी मोजकीच असतात.निवृत्तीनंतर शाळेकडे न फिरकणारे लोकही अनेक आहेत पण या सर्व गोष्टीला फाटा देत निवृत्तीनंतरही शाळेचा लळा न कमी झालेले शिक्षक हे खूप दुर्मिळ आहेत.यात मुर्डी यांचे नाव नक्कीच घ्यावे लागेल.
गावात नुकताच स्वातंत्र्य दिनाचा सोहळा साजरा करत असताना गावातील उपस्थित सर्व पालक, सरपंच, उपसरपंच, शालेय व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य
या सर्वांनी बोलावून इस्माईल मुर्डी यांचे अभिनंदन करत गावच्या प्रगतीत आणि विकासात योगदान दिल्याबद्दल कौतुक केले.गटशिक्षणाधिकारी प्रशांत अरबाळे,
शिक्षण विस्तार अधिकारी सोमशेखर स्वामी , हत्तीकणबस केंद्राचे केंद्रप्रमुख सुरेश शटगार यांनी मुर्डी यांच्या कार्याची दखल घेतली. विद्यार्थी प्रेमी आणि शिक्षणप्रेमी असलेल्या या निवृत्त शिक्षकाचा इतरांनीही आदर्श घ्यावा,अशी भावना ग्रामस्थांनी सर्वांसमोर व्यक्त केली.
गरीब विद्यार्थी चांगले शिक्षण घेतील
ज्या ठिकाणी आपण नोकरी करतो ते गाव आपले समजून आपण त्या शाळेकडे लक्ष दिले पाहिजे.अनेक विद्यार्थ्यांना आजही शैक्षणिक साहित्य विना शिक्षण घ्यावे लागते याबद्दल मला खंत वाटली म्हणून गरीब विद्यार्थ्यांना एक छोटीशी मदत व्हावी म्हणून हा उपक्रम सुरू केला आहे. यातून गरीब विद्यार्थ्यांना दिलासा मिळेल.
– इस्माईल मुर्डी,सेवा निवृत्त मुख्याध्यापक
गावकऱ्यांचा सहभाग देखील तितकाच महत्त्वाचा
शिक्षकांनीच आपल्या गावासाठी काहीतरी करावे ही भावना प्रत्येकाची असते पण गावकऱ्यांनी देखील शाळेसाठी काहीतरी केले पाहिजे ही भावना जर प्रत्येकाने ठेवली तर दोघांच्या समन्वयातून गावचा शैक्षणिक विकास होऊ शकतो.ही बाब मला प्रकर्षणाने दिसून आली म्हणून या विषयातील लक्ष घालून सहकार्य केले.शाळेसाठी मुर्डी यांनी दिलेले योगदान बहुमोल आहे.
श्रीशैल माळी,सरपंच