अक्कलकोट, दि.२४ : अक्कलकोट तालुक्यात मागच्या काही दिवसांपासून सातत्याने पाऊस पडत असल्याने टोमॅटो उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले आहेत. अति पावसामुळे शेतातील टोमॅटोचे नुकसान होत असून या नव्या संकटामुळे शेतकरी हतबल झाले आहेत.
तालुक्यातील वागदरी येथील शेतकरी नूरअहमद गुलाबसाब बागवान यांची बाग सध्या संकटात आहे.अति पावसामुळे हाताशी आलेल्या टोमॅटोचे पीक पूर्णतः नष्ट झाले आहे.टोमॅटो काढण्याच्या आधीच सतत पडणाऱ्या पावसामुळे पाण्यात गेले आहे.
सध्या टोमॅटोला चांगला भाव आहे. पण उपयोग नाही अशी स्थिती आहे.शेतकरी नूरअहमद गुलाबसाब बागवान टोमॅटोमुळे फायदा होईल या आशेत लागवड केली होती. पण हाताशी आलेला टोमॅटो डोळ्यांसमोर पाण्यात सडून जात आहे.जवळजवळ ५ ते ६ लाख रुपयेचे नुकसान झाले आहे.यामुळे शेतकरी आणखी संकटात सापडला आहे.
मोठ्या प्रमाणावर संततधार पाऊस सुरू असल्यामुळे मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान होत आहे. शेतामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे पिकांवर चिखलाचे साम्राज्य पसरलेले आहे.अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले आहे. संबंधित पिकाच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे शासकीय यंत्रणेकडून तात्काळ व्हावे व शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानाची भरपाई ताबडतोब मिळावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
तहसीलदारांनी
लक्ष द्यावे
गेली सहा महिने झाले प्रशासन अजूनही कोरोनाच्या कामात व्यस्त आहे.इतरही अनेक प्रश्न आहेत त्या कामातही लक्ष घालून ते त्वरित सोडवावेत,अशी मागणी पुढे येत आहे. याकडे तहसीलदार अंजली मरोड यांनी लक्ष द्यावे अशी तालुक्याची अपेक्षा आहे.